Paris Olympics 2024 – मनू भाकरने भाकर फिरवली!

>>द्वारकानाथ संझगिरी

मनू भाकरने हिंदुस्थानच्या पहिल्या पदकाची भाकर आपल्या ताटात वाढली. ती नुसती चविष्ट नाही, तर भूक वाढवणारी आहे. नेमबाजीतील पहिलं हिंदुस्थानी पदक तिने जिंकलंच, पण त्याचबरोबर नेमबाजीतलं पदक जिंकणारी ती पहिली हिंदुस्थानी महिला ठरली. 2000 साली वेटलिफ्टिंगमध्ये मल्लेश्वरीने पदक जिंकलं होतं. ते हिंदुस्थानी महिलेने जिंकलेलं पहिलं ऑलिंपिक पदक होतं. मनू भाकरचं अधिक चमकदार पदक 0.2 गुणांनी हुकल;. पण ऑलिंपिकच्या स्तरावर हिंदुस्थानला कास्यपदकसुद्धा सोनेरी वाटतं.

हिंदुस्थानी महिलेला पदक मिळालं की मला अधिक आनंद होतो. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, या देशात सर्वसाधारण महिलेला दीडशे वर्षांपूर्वी घरचा उंबरठा ओलांडणंही कठीण होतं. राजा राममोहन रॉय, महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे वगैरे मंडळींचं बोट धरून महिलांनी पहिल्यांदा घराचा उंबरठा ओलांडला. त्यासाठी या सुधारकांना समाजाचा जाळ अंगावर घ्यायला लागला. महिलांना दगड, शिव्या, बहिष्कार या गोष्टी सहन कराव्या लागल्या आणि आज हिंदुस्थानी महिला नुसता घराचाच नाही, तर देशाचा उंबरठा ओलांडून सिडनी, रिओ, टोकियो आणि पॅरिससारख्या ठिकाणी जातात. जगातल्या सर्वोत्कृष्ट महिलांबरोबर स्पर्धा करतात आणि पदक जिंकतात. आज आपण हिंदुस्थानी स्त्राrच्या सामाजिक सुधारणेमधला कळस पाहतो आहे, पण म्हणून पायाचे ते सुधारक भक्कम दगड कधीच विसरता येणार नाहीत.  मनू भाकर त्यातली एक!  ती हरयाणाची. हरयाणाची माती कुस्ती आणि बॉक्सिंगसाठी प्रसिद्ध आहे. त्या मातीत नेमबाज तयार करण्याची कुवत आहे हे तिने दाखवून दिलं. मनू भाकर तशी हाडाची खेळाडूच. ऑलिंपिकमध्ये मेरी कोमला पाहून तिला मेरी कोम बनावं असं आधी वाटलं. ती टेनिस, स्केटिंग, कुस्ती, मार्शल आर्टस्सारखे खेळ खेळायची. पण एके दिवशी तिने ठरवलं, नेमबाज व्हायचं. हरयाणाची परंपरा मोडायला वडिलांकडे पिस्तूल मागितले आणि वडिलांनी ते तिला दिले. तिला मिळालेल्या कांस्यपदकाचा जन्म हा तिथे झाला. त्यावेळेला ती फक्त चौदा वर्षांची होती. ऑलिंपिकचे पदक जिंकायचं हे तिचं स्वप्न होतं. अर्थात ते स्वप्न पूर्ण करणं तितपं सोपं नव्हतं. कारण नेमबाजी हा खेळ तसा महागडा खेळ आहे. पण वडिलांनी तिच्या महत्त्वाकांक्षेला खतपाणी घातलंच, पण हिंदुस्थानी सरकारनेसुद्धा तिला मदत केली. तिच्या उपकरणांचा खर्च, विविध देशांत स्पर्धांना जाण्यासाठी लागणारी मदत या गोष्टी पुरवल्या. योग्य वयात योग्य प्रशिक्षक मिळणे ही महत्त्वाची गोष्ट असते. तिला जसपाल राणासारखा प्रशिक्षक मिळाला. तिचा तो द्रोणाचार्य किंवा चाणक्य म्हणा हवं तर. टोकियो ऑलिंपिकला जाण्यापूर्वी तिने अनेक आंतरराष्ट्रीय पदकं जिंकली, पण टोकियो ऑलिंपिकने तिची निराशा केली. कर्णाचं चाक जसं ऐनवेळी जमिनीत रुतलं आणि तो हरला, तसंच ऐनवेळी तिच्या पिस्तुलामध्ये बिघाड झाला. तिने शर्थीचा प्रयत्न केला पण ती पदक जिंकू शकली नाही. ही गोष्ट तिला प्रचंड लागली; कारण पदकापर्यंत पोचणं ही सोपी गोष्ट नसते. प्रत्येक पावलावर वेगवेगळय़ा प्रकारचा त्याग करावा लागतो. घाम गाळावा लागतो, रक्त आटवावं लागतं, बालपण आणि तारुण्यातल्या लाडक्या गोष्टी या सर्व गोष्टींचं बलिदान द्यावं लागतं. पदक जिंकल्यावर मिळणारी ती प्रसिद्धी, ते पोडियमवर उभं असताना वाजणारं राष्ट्रगीत या सर्व गोष्टी लांबून कितीही आकर्षक वाटल्या, तरी तिथपर्यंत पोहोचणं ही फार फार कठीण गोष्ट असते. अक्षरशः नऊ ते पाच तिला रोज नोकरी केल्याप्रमाणे त्याच त्याच गोष्टी करायला लागायच्या. हे सर्व सोडायचा विचार तिच्या मनात अनेकदा आला. हे सारं सोडावं आणि अभ्यास करावा असं तिला वाटलं. पण इतक्या वर्षांची तिची मेहनत आणि गुणवत्ता मातीमोल ठरली असती. पण त्याच वेळची अॅक्शन फार महत्त्वाची असते. त्या क्षणाला घेतलेल्या निर्णयाने तिचं आयुष्य बदललं. तिने मनातले नकारात्मक विचार कोळीष्टक साफ करावे तसे साफ केले आणि तिच्या आधीच्या प्रशिक्षकाचा दरवाजा  खटखटवला. आणि ‘पुनश्च हरिओम’ म्हणत सरावाला सुरुवात केली. तिच्या पॅरिसच्या पदकाकडे जाणारा हा दुसरा टप्पा ठरला. मानसिक ताकद या खेळासाठी अत्यंत महत्त्वाची असते. कारण स्पर्धेआधी तुम्ही दोन तास अगदी एकटे असता. कोणाशी बोलणं नाही, संगीत ऐकणं नाही, काही नाही. मनात घोंगावणारे वेगवेगळे विचार आणि तुम्ही. हे वेगवेगळे विचार तुम्हाला डोक्यातून प्रयत्नपूर्वक काढावे लागतात. नकारात्मक विचार तर त्या मनातून ढकलून द्यावे लागतात आणि सकारात्मक विचार सातत्याने डोक्यात राहतील हे पाहावं लागतं. जेवढे हे लिहिणं सोपं आहे तेवढं ते करणं नाही. मनावर ताबा मिळवणे ही सोपी गोष्ट नाही. तिला गौतम बुद्धाच्या विपश्यनेने मन एकाग्र करायला मदत केलीच, पण त्याचबरोबर श्रीकृष्णाची गीतासुद्धा तिच्या मदतीला आली. गीतेबद्दल समाजात वेगवेगळी मतं असली तरी त्यात काहीतरी असामान्य आहे हे नक्की. म्हणूनच तर ज्ञानेश्वर, लोकमान्य टिळक किंवा विनोबा भावे यांसारख्या विद्वानांनी गीतेचा खोलात शिरून अभ्यास केला. भगवद्गीतेचा एक अध्याय ती रोज वाचते. गीतेचा हा श्लोक तिच्या आयुष्याचा भाग बनलाय.

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।

मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगो। स्त्वकर्मणि।।

कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करणं महत्त्वाचं. कृष्णाच्या या तत्त्वज्ञानाने हताश झालेल्या अर्जुनाला पुन्हा गांडीव धनुष्य उचलायची स्फूर्ती मिळाली. मनू भाकरला या अध्यायाने पुन्हा हातात पिस्तूल घ्यायची स्फूर्ती मिळाली आणि त्याचं फळ आज आपण पाहतोय. हिंदुस्थानचं हे पॅरिस ऑलिंपिकमधलं पहिलं यशस्वी पाऊल. अशी अनेक पावलं अजून पडावीत असं अर्थात आपल्या सर्व देशाचे स्वप्न आहे. पण मनू भाकरसारख्या ज्या  क्रीडापटू आहेत त्या फक्त पदक मिळवून देत नाहीत, तर त्यांच्या पराक्रमाने पदक मिळवणाऱ्या इतरांनाही स्फूर्ती देतात. हरयाणामध्ये पुढे अनेक नेमबाज मुलं किंवा मुली पाहायला मिळाल्या तर आपण आश्चर्य वाटून घेऊ नका. ती मनू भाकरने लावलेल्या रोपटय़ाची फळे असतील. तिने हरयाणात भाकर फिरवली आहे.