मीरा-भाईंदर महापालिकेच्या वतीने शहरात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित कलादालन साकारले जात आहे. राज्य शासनाने यासाठी 20 कोटींचा निधी मंजूर केला आहे. याशिवाय ऐतिहासिक घोडबंदर किल्ला संवर्धनासाठी 8 कोटी रुपये मंजूर केले आहेत. दोन्ही कामाची निविदा पालिकेने प्रसिद्ध केली आहे.
भाईंदर पूर्वेला आरक्षित जागेत आरक्षण क्रमांक 122 मध्ये शिवसेनाप्रमुखांचे कलादालन उभे करण्यासाठी यापूर्वी 50 कोटी रुपये निधी मंजूर असून त्यातून काम सुरू आहेत. आता शासनाने कलादालन परिसर सुशोभीकरण करण्यासाठी आणखी 20 कोटी रुपये मंजूर केले आहेत. कलादालनमध्ये बाळगोपाळांसाठी कल्पक आणि नावीन्यपूर्ण असे ‘चिल्ड्रेन सेंटर’ उभारण्यात येणार आहे. ज्यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आभासी जंगलाची आणि अॅक्वारियमची निर्मिती केली जाणार आहे. केवळ बाळगोपाळांसाठी नाही तर ज्येष्ठ नागरिक दालन, संगीत कक्ष, रंगमंच अशी व्यवस्था या कलादालनात असणार आहे.
स्फूर्तिदायक विचार
मराठी बांधव वशिवसैनिकांच्या संकल्पनेतून या कलादालनात अनेक नवीन गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. बाळासाहेबांचे विचार पुन्हा नव्या पिढीसाठी स्फूर्तिदायक ठरणार आहेत. हुतात्मा चौक, जुनी मुंबई, प्रबोधनकार ठाकरे यांचे तैलचित्र आणि विचार, ‘मुंबई बिफोर बाळासाहेब’ या संकल्पनांतर्गत जुन्या मुंबईचे दर्शन या ठिकाणी होणार आहे.
पुरातत्त्वाच्या मार्गदर्शनाखाली काम
घोडबंदर किल्ला संवर्धन, सुशोभीकरण काम करताना म्युझिकल फाऊंटन, गार्डन, रात्री लाईट इफेक्ट्स, किल्ल्याची माहिती देणारे फलक अशी विविध कामे आहेत. पुरातत्त्व विभागाशी संवाद ठेवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व कामे केली जाणार आहेत.