‘सिंग इज किंग’ पंजाबच्या सुपूत्राने पटकावला ICC चा सर्वोत्तम पुरस्कार, बाबर आझमसह ‘या’ खेळाडूंना चारली धूळ

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 2024 या वर्षात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसाठी पुरस्कारांची घोषणा केली आहे. अर्शदिप सिंगची ICC T20 Cricketer Of The Year 2024 म्हणून निवड करण्यात आली आहे. टी20 क्रिकेटमध्ये त्याने आपल्या धारधार गोलंदाजीने दिग्गज फलंदाजांच्या दांड्या गुल केल्या आहेत. त्यामुळेच त्याची टी20 क्रिकेटमधील 2024 या वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. या शर्यतीत अर्शदिप सिंग व्यतिरिक्त बाबर आझम, सिकंदर रझा आणि ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ट्रेव्हिस हेडचा सुद्दा समावेश होता. परंतु या सर्वांना धूळ चारत अर्शदिप सिंगने पुरस्कारावर मोहर उमटवली आहे.

अर्शदिप सिंगने वेगवान आणि अचूक मारा करत वेळोवेळी टीम इंडियासाठी फायदेशीर गोलंदाजी केली आहे. त्याने 2024 या वर्षामध्ये 18 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले असून 13.50 च्या सरासरीने 36 विकेट घेतल्या आहेत. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टी20 वर्ल्डकप उंचावला होता. या संपूर्ण स्पर्धेत अर्शदिप सिंगने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत 8 सामन्यांमध्ये 17 फलंदजांना तंबुचा रस्ता दाखवला होता.