>> व्यंकटेश सामक, [email protected]
‘आयुका’ (अंतर-विश्वविद्यालय केंद्र ः खगोल विज्ञान आणि खगोलभौतिकी) हे नाव आता विद्यार्थ्यांना नवीन नाही आणि या संस्थेचे नाव घेतले की, ज्या असामान्य व्यक्तीचे नाव त्याबरोबर घेतले जाते ते म्हणजे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर! या असामान्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली 1988 साली आयुकाची स्थापना झाली आणि थोडय़ाच काळात ही संस्था आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखली जाऊ लागली. या थोर शास्त्रज्ञाच्या मार्गदर्शनाखाली मला गेली 27 वर्षे काम करायची संधी मिळाली, तेव्हा नशीब किंवा भाग्य म्हणजे काय असते याची प्रचीती मला आली असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही… डॉ. जयंत नारळीकर आजच्या वाढदिवसानिमित्त…
आयुका या संस्थेत मी 1995च्या ऑगस्ट महिन्यात रुजू झालो. पहिल्या दिवशी ‘आयुका’च्या कार्मिक विभागाच्या प्रमुखांनी प्रथेप्रमाणे माझी सर्व ‘आयुका’ सदस्यांशी ओळख करून दिली. सर्वात शेवटी त्यांनी मला त्यावेळच्या संचालकांची ओळख करून देण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये नेले आणि ही व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नव्हती, तर ते होते खुद्द डॉ. जयंत नारळीकर! ते म्हणाले, ‘आयुका’मध्ये तुमचे स्वागत आहे. ही तुमची पहिलीच शासकीय नोकरी का? मी त्यांना अभिवादन करून ‘हो’ म्हणून उत्तर दिले. ही माझी व त्यांची पहिली भेट होती. त्या वेळी मी फक्त 22 वर्षांचा होतो.
‘आयुका’मध्ये ‘शिपाई’ ही प्रथाच नाही. प्रत्येकाने स्वतःची कामे स्वतःच करायची हा पायंडा नारळीकर सरांनी घालून दिला आहे. प्रत्येक ‘आयुका’ सदस्य ऑफिसचं कामच नव्हे, तर चहा, कॉफी, लंच, डिनर हेसुद्धा पॅन्ट्री किंवा पॅन्टीनमध्ये स्वतः जाऊन घेतात. ‘आयुका’त रुजू झाल्यावर काही महिन्यांनी मी पॅन्ट्रीजवळून जात असताना सरांनी आतून मला हाक मारली व म्हणाले की, तुम्ही उद्यापासून माझ्या ऑफिसमध्ये माझे सहायक म्हणून काम करणार आहात. हे ऐकून जरी मला आनंद झाला तरी मनात भीतीही वाटली. कारण सरांच्या शिस्तीमुळे आणि आदरामुळे सगळ्या ऑफिसमध्ये त्यांचा दबदबा आहे. सर नेहमी ऑफिसच्या वेळेच्या आधी हजर असायचे. 1988 ते 2003 पर्यंत त्यांनी ‘आयुका’चे संस्थापक संचालक म्हणून काम पाहिले. त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) त्यांना तहहयात सन्माननीय निवृत्त प्राध्यापक हे पद देऊ केलं.
त्यांचा सहाय्यक म्हणून काम करताना मला काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. त्यांच्या संशोधन कार्याविषयी बोलण्याची माझी पात्रता नाही, परंतु त्यांच्या ऑफिसमध्ये काम करीत असल्यामुळे देश-विदेशातील अनेक शास्त्रज्ञ आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर लोकांशी माझा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या संबंध आला. डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे राष्ट्रपती असताना त्यांच्या ‘आयुका’ भेटीत त्यांना भेटण्याची संधी मिळाली.
नारळीकर सरांची वेळ पाळण्याची शिस्त तर नेहमीच थक्क करणारी आहे. त्यांनी एकदा का एखाद्या व्यक्तीला भेटण्याची वेळ दिली, ती व्यक्ती कोणीही मान्यवर असो किंवा एखादा विद्यार्थी असो, ती वेळ पाळली गेली नाही असे झाले नाही. यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकदा का त्यांनी एखाद्या व्यक्तीला किंवा विद्यार्थ्याला भेटायची वेळ दिली आणि त्यानंतर एखाद्या व्हीआयपी/मान्यवर व्यक्तीने किंवा मंत्री यांनी जरी तीच वेळ मागितली तरी त्यांनी कधी त्या व्यक्तीची किंवा विद्यार्थ्याची भेट रद्द केली नाही, तर व्हीआयपी /मान्यवर व्यक्तींना दुसरी वेळ दिली.
या त्यांच्या शिस्तीचा फटका मलाही बसला आहे. मला एकदा ऑफिसला पोहोचायला वेळ झाला, तेव्हा माझ्या टेबलावर चिठ्ठी होती, ‘9 वाजून 1 मिनिटे आणि 13 सेपंद – जेव्हीएन’. अर्थात, मला 1 मिनिटे आणि 13 सेपंद उशीर झाला होता.
सरांनी कधीही आपला वेळ औपचारिक कार्यक्रम अथवा समारंभासाठी घालवलेला मी पाहिलेला नाही. अशा कार्यक्रमात आपला वेळ ना घालवता तो वेळ संशोधन कार्यात, पुस्तक लिखाणात किंवा विज्ञान प्रसारात घालवला. एखाद्या शाळा, महाविद्यालयाने जर सरांना त्यांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केले तर सरांनी अशा आमंत्रणाचा स्वीकार वेळात वेळ काढून केलेला मी पाहिला आहे. मला एक प्रसंग आठवतो, जेव्हा सरांनी एका संस्थेचे भाषणासाठीचे आमंत्रण स्वीकारले होते. काही दिवसांनी सरांना एक मोठा पुरस्कार जाहीर झाला व त्याचे वितरण करण्यासाठीचा दिवस आणि सरांचा वरील नमूद केलेला भाषणाचा दिवस, असे दोन्ही कार्यक्रम एकाच दिवशी आले. सरांनी पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करणाऱयांना विनंती करून तो दिवस बदलण्याची विनंती केली, पण त्यांच्या भाषणाची तारीख आणि वेळ बदलली नाही. अशी व्यक्ती एखादीच!
अनेक लोकांच्या मनात एक प्रश्न उभा राहतो की, सरांनी ‘आयुका’सारख्या संस्थेची निर्मिती केली, त्यांचे आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधून सुमारे 350 शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत, 1200 हून अधिक मराठी, हिंदी व इंग्रजीतून लेख त्यांनी लिहिले, शंभराहून अधिक त्यांची पुस्तके आहेत. हे सर्व त्यांनी कसे काय जमवले असेल? त्यामागचे कारण आहे त्यांच्या वेळेचे व कामाचे नियोजन. त्यांचा साधारणतः थोडक्यात दिनक्रम असा ः सर नेहमी सकाळी वेळेच्या आधी ऑफिसमध्ये हजर असत. प्रथम पत्रव्यवहार संपवून मग ते ‘आयुका’च्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱयांना भेटत, त्यांच्याबरोबर प्रशासकीय कामे मार्गी लावल्यानंतर मग संशोधन कार्याकडे वळत. दुपारी 3 नंतर ते बाहेरील व्यक्तींच्या गाठीभेटी घेत.
‘आयुका’चे संस्थापक संचालक व एक जागतिक शास्त्रज्ञ असल्यामुळे विविध समित्यांवर त्यांची नियुक्ती होती. त्यातील काही समित्यांचे इतिवृत्त तयार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असे. सर बैठकीला जाण्याअगोदर त्या बैठकीच्या इतिवृत्ताचा मसुदा तयार करीत व बैठक झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे बदल करून ते सदस्यांसमोर लगेच त्यांच्या मंजुरीसाठी ठेवीत याचे नेहमीच मला आश्चर्य वाटे. बैठक संपल्यानंतर लगेच त्याचे इतिवृत्त तयार असणे हे खरोखर आश्चर्यकारक नव्हे का?
प्रत्येक यशस्वी व्यक्तीमागे एका स्त्राrचा हात असतो असे म्हणतात. सरांच्या पत्नी डॉ. मंगला नारळीकर या त्यापैकी एक. सर हे सर्व कामात व्यस्त असताना त्यांनी घर, सासू-सासरे, मुली यांची जबाबदारी स्वीकारल्यामुळे सरांना बाहेरच्या जबाबदाऱया पार पाडणे शक्य झाले हेही विसरता येणार नाही. एवढेच नव्हे, तर या जबाबदाऱया पार पाडीत असताना त्यांनी गणितातली पीएच.डी. तर पूर्ण केलीच, कित्येक गरजू विद्यार्थ्यांना गणिताचे मार्गदर्शनही केले. तसेच काही पुस्तके आणि लेखही लिहिले.
सरांच्या काही पुस्तकांची, लेखांची (इंग्रजी, हिंदी, संस्कृत आणि मराठी) पांडूलिपी (manuscript) तयार करण्याची संधी मला मिळाली. ती तयार करत असताना त्यांचे अक्षर बघून असे वाटे की, त्यावर प्रक्रिया करण्याची गरजच नाही. त्यांचे लिखाण जसेच्या तसे प्रकाशनासाठी गेले तरी चालू शकते, इतके सुंदर, सुवाच्य अक्षर. त्यांच्या काही पुस्तकांच्या प्रस्तावनांमध्ये त्यांनी माझे नाव नमूद केले आहे, हीच माझ्याकरिता मोठी भाग्याची गोष्ट आहे. यामध्ये सरांच्या ‘चार नगरांतले माझे विश्व’ या आत्मचरित्राचाही समावेश आहे. विद्यार्थ्यांनी हे आत्मचरित्र जरूर वाचावे, ते त्यांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल.
(लेखक आयुका पुणेमध्ये सेक्शन ऑफिसर आहेत.)