बदलापूरची घटना ताजी असतानाच कल्याण तालुक्यातील एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा लंपट तरुणाने विनयभंग केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन 10 दिवस झाले तरी नराधम मोकाट आहे. पोलीस फरार आरोपी गणेश शेलारला अटक करत नसल्यामुळे टिटवाळा, मोहने, रायता परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. ‘आरोपीला अटक करा नाही तर आम्हाला फाशी द्या’ असा संताप करत आज पीडित मुलीच्या पालकांसह ग्रामस्थांनी टिटवाळा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.
23 सप्टेंबर रोजी अंबरनाथ आयटीआय येथे पीडित अल्पवयीन मुलगी रजिस्ट्रेशन करण्यासाठी गेली होती. काम संपवून घरी येण्यासाठी ती साडेपाच वाजता रायता पांजरपोळ येथे रिक्षाची वाट पाहात थांबली होती. इतक्यात तिच्या गावातील गणेश शेलार हा कार घेऊन आला. तुला घरी सोडतो असे त्याने सांगितले. ओळख असल्याने पीडित मुलगी गाडीत बसली. मात्र काही वेळातच तो मुलीशी अश्लील चाळे करू लागला. मुलीने प्रखर विरोध केला व गाडीतून उतरली. घरी आल्यावर घाबरलेल्या मुलीने कुटुंबीयांना सर्व हकिगत सांगितली. तातडीने कुटुंबीयांनी टिटवाळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन नराधम गणेश शेलारविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र 10 दिवस उलटले तरी आरोपी गणेश शेलारला पोलिसांनी अटक केली नाही. त्यामुळे आज कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपीला अटक करा अन्यथा आम्हाला फासी द्या, असा संताप करत ठिय्या आंदोलन केले.
लवकरच आरोपीच्या मुसक्या आवळू
ग्रामस्थांचा संताप पाहून पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांची दोन विशेष पथके फरार आरोपी गणेश शेलारचा शोध घेत आहेत. लवकरच त्याच्या मुसक्या आवळू अशी ग्वाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी दिली. यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. मात्र दोन दिवसांत आरोपीला अटक केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.