दरोड्याच्या पूर्वतयारीत असणार्‍या आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या; साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

जालना तालुक्यातील मौजपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामनगर-साखर कारखाना परिसरात बुलढाणा जिल्ह्याातील तामगाव पोलीस ठाणे हद्दीतील संग्रामपुर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे एटीएम मशीन पहाटे चोरी करुन ते फोडण्याच्या इराद्याने आलेल्या दरोडेखोरांना मौजपुरी पोलिसांनी अटक करुन त्यांच्या ताब्यातून 5 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यातील पाच पैकी तीन दरोडेखोर फरार झाले असून दोन आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहे. यावेळी दरोडेखोर व पोलिसांची यावेळी झटापट झाली. दोन्ही आरोपींवर जिल्ह्यासह इतरही जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी यांनी जिल्हातील सर्व पोलीस ठाणेला सतर्कपणे पेट्रोलिंग करणेचे आदेश दिले होते. मौजपुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक नेटके, सफो.प्रकाश जाधव,पोहेकॉ. नितीन खरात, पोहेकॉ.सुरेंद्र कोरडे, चालक पोहेकॉ.भगवान खरात, प्रदिप पाचरणे, अविनाश मांटे रविवारी 9 वाजता सुमारास मौजपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना खबऱ्य़ाकडून बातमी मिळाली की, काहीजण दरोडा टाकण्याच्या तयारीत रामनगर-कारखाना परिसरातील हॉटेल लंकाच्या पाठीमागील पांढर्‍या घराच्या पाठीमागे काहीजण काहीतरी दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने दबा धरुन बसले आहे, अशी माहिती मिळाल्यावरुन पोलीस उपनिरीक्षक राकेश नेटके व पोलीस स्टाफ यांनी सहायक पोलीस निरीक्षक मिथून घुगे यांच्या आदेशाने पंचासह सदर ठिकाणी गेले. तेथे पाचजण अशोक ली लॅण्ड वाहनाचे मागे दबा धरुन बसलेले दिसल्याने पंचासमक्ष तेथे जाऊन त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पोलीसांसोबत झटापट केल्याने पोलीसांनी योग्य त्या बळाचा वापर करुन त्यातील दोन दरोडेखोरांना पकडले असून तीनजण तेथून पळून गेले आहे.

पकडलेल्या आरोपींमध्ये दयालसिंग गुलजारसिंग टाक (रा. म्हाडा कॉलनी,टि.व्ही.सेंटर, जालना),नरसिंग अथरसिंग बावरी (रा. शिक्कलकरी मोहल्ला, मंगळ बाजार, जालना) असे असून पळून गेलेल्या तीनजणांपैकी एकाचे आकाशसिंग नरसिंग बावरी (रा. शिक्कलकरी मोहल्ला, मंगळ बाजार, जालना) असे आहे. पकडलेल्या इसमांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ दरोडा टाकण्याचे साधन साहित्य मिळून आले. त्यांच्या ताब्यातील अशोक ली लॅण्ड पिकअप वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडीया बँकेचे ए.टी.एम मशीन अर्थवट तुटलेली तसेच इतर साधन साहित्य असे एकुण 5 लाख 50 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल सापडला आहे.

आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभुमी आरोपी दयालसिंग गुलजारसिंग याच्यावर जालना, परभणी, बीड, छत्रपती संभाजीनगरच्या विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आले. तर आरोपी नरसिंग अथरसिंग बावरी याच्यावर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहे. दोन्ही आरोपीतांना अटक करण्यात आलेली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राकेश नेटके हे करीत आहेत. संग्रामपुर येथील स्टेट बँक ऑफ इंडीया बँकेचे ए.टी.एम मशीन आरोपींच्या ताब्यात मिळालेल्या ए.टी.एम मशीन बाबत माहिती घेतली असता आरोपींनी व त्यांच्या साथीदारांनी बुलढाणा जिल्हयातील तामगाव पोलीस ठाणे हद्दीतील संग्रामपुर येथील स्टेट बँक ऑफ इंडीया बँकेचे ए.टी.एम मशीन पहाटे चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे , अपर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी, परतुर उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली मौजपुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, पोलीस उपनिरीक्षक राकेश नेटके, प्रकाश जाधव, नितीन खरात, भगवान खरात, सुरेंद्र कोरडे, प्रदिप पाचरणे, अविनाश मांटे, ज्ञानोबा बिरादार, राजेंद्र देशमुख, मच्छिद्र वाघ, पंकज बाजड, कैलास शिवनकर, नंदकिशोर नागरे, शेलेंद्र आडेकर यांनी केली आहे.