जम्मू-कश्मीरमधील बांदीपोरा येथे शनिवारी लष्कराचा ट्रक डोंगरावरून दरीत कोसळला. या अपघातात 2 जवानांना वीरमरण आले असून 5 जवान गंभीर जखमी झाले आहेत. सैनिकांना घेऊन जाणाऱ्या लष्कराच्या ट्रकला बांदीपोरा येथील कूट पायीन भागाजवळ एका वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला, अशी माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या दुर्घटनेतील जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी सुरक्षा दल आणि पोलीस दाखल झाले आहेत. गेल्या 20 दिवसांत लष्कराच्या वाहनाला अपघात होण्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी 24 डिसेंबर रोजी लष्कराचे एक वाहन रस्त्यावरून घसरले आणि पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) 300 फूट खोल दरीत पडले. या अपघातात 5 जवानांना वीरमरण आले असून चालकासह 5 जवान गंभीर जखमी झाले होते. सहा वाहनांच्या ताफ्यातील एक 2.5 टन वजनाचे वाहन पूंछजवळ ऑपरेशनल ट्रॅकवर जात असताना रस्त्यावरून दरीत पडले. बांदीपोरा येथेच 15 डिसेंबर रोजी लष्कराच्या वाहनाला अपघात झाला होता. हे वाहन बांदीपोराहून गुरेझच्या दिशेने जात असताना जेडखुसी नाल्याजवळ अपघात झाला, त्यात अनेक सैनिक जखमी झाले.
4 नोव्हेंबर 2024 रोजी राजौरी जिल्ह्यात वाहन रस्त्यावरून घसरून खड्ड्यात पडल्याने लष्कराच्या एका जवानाला वीरमरण आले होते.तर दुसरा जवान जखमी झाला होता. 2 नोव्हेंबर 2024 रोजी, रियासी जिल्ह्यात एक कार डोंगराच्या रस्त्यावरून घसरून खोल दरीत पडल्याने एक महिला आणि तिच्या 10 महिन्यांच्या मुलासह तीन जणांचा मृत्यू झाला आणि तीन जण गंभीर जखमी झाले. आता शनिवारी बांदीपोरा येथे लष्कराचे वाहन दरीत कोसळल्याने दोन जवांना वीरमरण आले आहे, तर पाच जवान गंभीर जखमी झाले आहेत.