केरळमध्ये लष्करी अधिकाऱ्यावर NCC कॅम्पमध्ये जीवघेणा हल्ला; नगरसेवकासह 2 आरोपींना अटक

केरळमध्ये लष्कराच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना सोमवारी उघडकीस आली होती. कोचीच्या थ्रिकाकारा येथील ‘केएमएम कॉलेज ऑफ आर्टस अँड सायन्स’ येथे हा प्रकार घडला होता. या प्रकरणी आता पोलिसांनी स्थानिक नगरसेवकासह अन्य एकाला अटक केली आहे. निषाद आणि नवस अशी दोघा आरोपींची नावे आहेत.

केएमएम कॉलेज ऑफ आर्टस अँड सायन्स येथे एनसीसी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सहभागी झालेल्या जवळपास 80 कॅडेट्सला अन्नातून विषबाधा झाली होती. यानंतर स्थानिक नगरसेवकासह अन्य एक जण एनसीसी शिबिरामध्ये घुसतो आणि लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल सिंह यांना मारहाण करतो. आरोपी लष्करी अधिकाऱ्याचा गळा दाबतात आणि त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करतात. याचा व्हिडीओही समोर आला आहे.

व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतेय की एक व्यक्ती लेफ्टनंट कर्नल सिंग यांना धक्का देतो आणि गळा दाबण्याचा प्रयत्न करतो. तर दुसरा व्यक्ती त्यांना पकडून भिंतीकडे ढकलतो. त्यानंतर निळा शर्ट घातलेला व्यक्ती एक चाकूसारखे हत्यारही काढतो आणि लष्करी अधिकाऱ्याला धमकावतो. यावेळी तिथे उपस्थित पोलीस मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतो असेही व्हिडीओमध्ये दिसतेय.

23 डिसेंबर रोजी हा प्रकार घडला असून या हल्ल्यात कर्नल सिंह यांच्या मानेला आणि पाठीला दुखापत झाली आहे. याप्रकरणी थ्रिक्काकरा पोलीस स्थानकात 24 डिसेंबर रोजी एफआयआर दाखल करण्यात आली. पोलिसांनी संबंधित आरोपींविरोधात भादवी कलम 329(3), 126(2), 351(2) आणि 115(2) तसेच 118(1), 121(1) आणि 3(5) कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. निषाद (रा. कोची) आणि नवस (रा. पल्लुरुथी) अशी आरोपींची नावे आहेत. कर्नल सिंह यांनीही त्यांना ओळखले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.