खासगी ट्रॅव्हल्सच्या मनमानी भाडे आकारणीला बसणार चाप

दीपावलीच्या सुट्टीत प्रवासी मोठ्या संख्येने गावाकडे येत असतात. त्यामुळे अनेक खासगी ट्रॅव्हल्स व्यावसायिक मनमानीपणे भाडे आकारणी करत असल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. त्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने खासगी ट्रॅव्हल्सवर करडी नजर ठेवली असून, दि. 21 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या कालावधीत बसेसची तपासणी मोहीम ठिकठिकाणी राबवली जाणार आहे.

दीपावली सणामुळे परगावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी अधिक असते. त्याचा फायदा खासगी बसचालक घेऊन प्रवासी भाडे अवाच्या सवा आकारले जाते, अशा विविध तक्रारी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे येत आहेत. परिवहन आयुक्त कार्यालयाने शासनाने विहीत केलेल्या कमाल भाडेदरापेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या खासगी कंत्राटी प्रवासी बसेसची तपासणी करून दोषी आढळून आलेल्या वाहनाविरुद्ध कारवाई करण्याबाबत सूचना जारी करण्यात आल्या आहेत. तथापि खासगी कंत्राटी बसेसच्या वाहतूकदार व प्रवाशांकडून जादा भाडे आकारण्यात येत असल्याचे तसेच खासगी प्रवासी बसेसना आगी लागणे, अपघात होणे या घटना निदर्शनास येत आहेत. या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी व रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वायूवेग पथक व एसटीच्या सुरक्षा व दक्षता पथकामार्फत दि. 21 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या कालावधीत महामार्ग, राज्यमार्ग व जिल्हा मार्गावर बसेसची तपासणी करण्यात येणार आहे.

तपासणी मोहिमेवेळी खासगी बस वाहतूकदारांच्या ठिकठिकाणच्या बुकिंग कार्यालयांना भेटी देऊन, ऑनलाइन आरक्षित केलेल्या तिकिटांचा तपशील तपासून पाहण्यात येणार आहे. तसेच प्रवाशांशी संवाद साधून भाडे आकारणी योग्य असल्याची खात्री केली जाणार आहे. प्रवाशांना प्रवास करताना येणाऱ्या अडचणींबाबत कार्यालयाच्या हेल्पलाईन क्रमांक 02162230230 यावर तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले आहे.

खासगी बसेसची सखोल तपासणी केली जाणार आहे. तपासणीदरम्यान दोषी आढळून आलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायदा व तनुषंगिक नियमातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी सातारा दशरथ वाघुले यांनी सांगितले.

बसेसमध्ये या बाबींची होणार तपासणी
मोहिमेत ट्रॅव्हल्समध्ये विनापरवाना अथवा परवान्याच्या अटींकचा भंग करून वाहन चालवणे, टप्पा वाहतूक, प्रवासी बसमधून अवैधरीत्या माल वाहतूक, योग्यता प्रमाणपत्र, रिफ्लेक्टर, इंडिकेटर, टेल लाईट, वायपर आदी बाबींची तपासणी, वाहनांमध्ये बेकायदेशीर केलेले फेरबदल, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, मोटार वाहन कर भरल्याची खात्री करणे, जादा भाडे आकारणी, अग्निशमन यंत्रणा कार्यरत असणे, आपत्कालीन निर्गमन दार आणि इतर दरवाजे कार्यरत स्थितीत आहेत काय? या बाबींची तपासणी केली जाणार असल्याची माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप म्हेत्रे यांनी दिली.