चोरीचा मामला, 25 कोटींवर डल्ला; तनिष्क ज्वेलर्सच्या शोरूममध्ये दिवसाढवळ्या लूटमार

दरोडा, लूटमारी, चोरीच्या गुन्ह्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. चोरटे आधीच दुकानांची, घरांची रेकी करून मग त्यावर डल्ला मारतात. अशीच एक चोरीची घटना बिहारच्या आरामध्ये घडली. आरामधील गोपाली चौकातील तनिष्क ज्वेलर्सच्या शोरूमवर चोरट्यांच्या टोळीने दिवसाढवळ्या डल्ला मारला. या चोरट्यांनी आर्ध्या तासात 25 कोटींचे सोने लंपास केले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळच्या सुमारास ही चोरीची घटना घडली. दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या चोरट्यांनी शोरूममधील गर्दीचा अंदाज घेऊन दोन गटांत दुकानात प्रवेश केला. काहींच्या हातात बंदूक तर काहींच्या हातात धारदार शस्त्र होती. दुकानात शिरल्यावर चोरट्यांनी बंदूकीच्या धाकावर शोरूममधील लोकांना आणि तेथील स्टाफला घाबरवले आणि शोरूममधील सर्व दागिने एका बॅगमध्ये भरले. एवढेच नाही तर शोरूमची तोडफोड करून चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.

 

दरम्यान, चोर जेव्हा तनिष्क ज्वेलर्सच्या दुकानात शिरले तेव्हाच तेथील सेल्स गर्लने पोलिसांना फोन लावण्याचा प्रयत्न केला. तब्बल 20 ते 30 वेळा पोलिसांना फोन लावूनही कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही, असे ज्वेलर्सच्या मालकाने सांगितले. चोर चोरी करून फरार झाल्याच्या नंतर पोलीस घटनास्थळावर पोहोचले. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.