मुंबईमध्ये बोरिवली आणि भायखळ्यामध्ये बिघडलेली हवेची गुणवत्ता आता सुधारली असली तरी नेव्हीनगर कुलाबा आणि शिवाजीनगर गोवंडीसारख्या ठिकाणी हवेची गुणवत्ता खालावलेलीच आहे. त्यामुळे कुलाबा आणि गोवंडीत ‘एक्यूआय’ 200 वर म्हणजेच हवेचा दर्जा पुढील चार दिवस ‘खराब’ राहिल्यास या ठिकाणची सर्व प्रकारची बांधकामे बंद करण्यात येतील, अशी माहिती आज पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी दिली.
मुंबईतील वाढत्या प्रदूषणाबाबत पालिका आयुक्तांनी महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. सर्वसाधारणपणे पावसाळय़ामध्ये हवेतील प्रदूषणकांची पातळी सर्वात कमी व हिवाळय़ात सर्वाधिक असते. पावसाळ्य़ात पावसाच्या पाण्याबरोबर मिसळल्याने व समुद्रावरून येणाऱ्या वेगवान नैऋत्व मोसमी वाऱ्यांमुळे हवेतील धुलीकणांचा निचरा होतो. हिवाळय़ात कमी तापमानामुळे व वेगवान वाऱ्याच्या अभावाने जमीनीलगतची प्रदूषके ही उंचीवरील हवेत मिसळल्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे तयार होणाऱ्या प्रदूषकांचा निचरा न झाल्याने हवेतील प्रदूषणात वाढ होत असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
प्रदूषणाची कारणे
- नवीन बांधकामे / पुनर्विकास / मूलभूत सोयीसुविधा विकासाची कामे (मेट्रो, कोस्टल रोड इ.).
- रस्त्यावरील वाहनांची वर्दळ, पालापाचोळा/घरगुती घनकचरा जाळल्यामुळे.
- प्रदूषणकारी उद्योगांमुळे आणि मुलुंड, देवनार येथील डंपिंग ग्राऊंडवर आगी लागणे.
अशी मोजली जातेय प्रदूषणाची पातळी
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मुंबई शहरमध्ये एकूण 14 ठिकाणी प्रदूषण मापक तपासणी यंत्राची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याव्यतिरिक्त पेंद्र शासनाच्या ‘आयआयटीएम’, ‘सफर’ संस्थेच्या वतीने केंद्रे स्थापित केलेली आहेत. या केंद्रांमधून अद्ययावत माहिती एकत्रित करून ती दररोज प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येते.
पालिका अशा करतेय उपाययोजना
- बांधकामामुळे होणाऱ्या धुळीवर नियंत्रण आणणे
- इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणे
- वाहतूक सिग्नलमध्ये सुसूत्रता आणणे
- स्मशानभूमीत पाईप्ड नॅचरल गॅसचा वापर करणे
- कचऱयापासून ऊर्जानिर्मिती प्रकल्पाची स्थापना करणे
- रस्त्यांच्या साफसफाईसाठी यांत्रिक झाडूचा वापर करणे
- सौर ऊर्जेचे विविध स्रोत तयार करणे
- ‘मियावाकी’ संकल्पनेवर आधारित उद्यानांचा विकास