
परीक्षा पे चर्चा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांना परीक्षा काळात वाढणाऱया ताणतणावापासून दूर राहावयास सांगत असतात; परंतु यंदा शिक्षण विभागाने शाळांच्या वार्षिक परीक्षा काळातच संकलित मूल्यमापन चाचणीसारख्या (पॅट) बाह्य परीक्षांचे आयोजन केल्याने विद्यार्थ्यांचा मार्चबरोबरच एप्रिलही परीक्षाफुल ठरणार आहे. 8 ते 25 एप्रिल या कालावधीत या परीक्षा होणार आहेत.
एकामागोमाग होणाऱया परीक्षांमुळे दीड महिना विद्यार्थी परीक्षांमध्येच बुडालेला असेल. दुसरीकडे वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक ठरविण्याच्या शाळांच्या अधिकारावरही हे अतिक्रमण ठरणार आहे. आधीच स्कॉफ, एनईपी प्रशिक्षणाच्या कामाने शिक्षक बेजार झाले आहेत. त्यात या वेळापत्रकामुळे संतापात भर पडली आहे.
शाळांमध्ये साधारणपणे 20 मार्चच्या सुमारास वार्षिक परीक्षा सुरू होऊन 10 एप्रिलपर्यंत चालतात. त्यानंतर 30 एप्रिलपर्यंत पेपर तपासणी, निकालाचे काम, नववीच्या विद्यार्थ्यांचे दहावीचे वर्ग सुरू करून शिक्षक त्या कामात गुंततात. परंतु आता वार्षिक परीक्षा आणि त्यानंतर पॅट म्हणून ओळखल्या जाणाऱया परीक्षांचे आयोजन शिक्षकांना करावे लागणार आहे. एप्रिल महिन्यातील मुलांचे अध्ययनाचे दिवस वाया जाऊ नये म्हणून या परीक्षांचे वेळापत्रक शिक्षण आयुक्तांनी ठरवून दिले आहे.
गेल्या वर्षी 10 एप्रिलपर्यंत पॅट परीक्षा झाल्या होत्या. पॅटमध्ये मराठी, इंग्रजी आणि गणित या विषयांची परीक्षा घेतली जाते. नव्या वेळापत्रकामुळे यंदा 25 एप्रिलपर्यंत परीक्षा लांबणार आहेत. त्यात निकाल अवघ्या पाच दिवसांत म्हणजे 1 मेपर्यंत लावण्यास सांगण्यात आले आहे. सर्व विषयांचा संकलित निकाल केवळ पाच-सहा दिवसांत लावणे शक्य नाही, असे सांगत महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे यांनी नाराजी व्यक्त केली. शिवाय पॅट परीक्षांचे गुण ऑनलाइन भरावे लागणार आहेत ते वेगळे. त्यामुळे पॅट परीक्षांचे नियोजन शाळास्तरावर करण्याची मागणी शिक्षकांकडून होत आहे.
शिक्षण आयुक्तांचे स्पष्टीकरण
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीसच वार्षिक परीक्षा होत असल्याने अध्ययनाचा कालावधी कमी होतो. तसेच प्रत्येक शाळेचे वेळापत्रकही वेगळे असते. राज्यातील सर्व शाळांमध्ये एकवाक्यता असावी आणि उपलब्ध वेळेचा पुरेपूर उपयोग विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी व्हावा यासाठी पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा (संकलित चाचणी 2) आणि पॅटचे (नियतकालिक मूल्यांकन) वेळापत्रक तयार करण्यात आल्याचे शिक्षण आयुक्तांनी स्पष्ट केले.
छंदवर्ग, उपचारात्मक अध्ययनाला कात्री
वार्षिक परीक्षांनंतर काही शाळांमध्ये 30 एप्रिलपर्यंत उपचारात्मक अध्यापन, उन्हाळी सुट्टीतील छंद वर्ग, हस्ताक्षर, चित्रकला, हस्तकला अशा विविध वर्गांचे आयोजन केले जाते. परंतु परीक्षा मूडमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांकरिता यंदा हे काहीच करता येणार नाही.