श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. येणाऱ्या भाविकांचे सुलभ व वेळेत दर्शन व्हावे, यासाठी तिरुपती व शिडीं देवस्थानच्या धर्तीवर टोकन दर्शन पद्धत राबविण्यासाठी आवश्यक संगणक प्रणाली विकसित करून देण्याबाबत टीसीएस कंपनीला प्रस्ताव देण्यात आला होता. त्यावर कंपनीने मोफत संगणक प्रणाली विकसित करून देण्याचा प्रस्ताव मंजूर केला असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास येथे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक संपन्न झाली. यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, अॅड. माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे गुरुजी, ह.भ.प. शिवाजीराव मोरे तसेच कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखा अधिकारी मुकेश अनेचा व मंदिर समितीचे सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर जतन, संवर्धन व जिर्णोद्वार कामाचा आढावा घेऊन कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करावीत, अशा सूचना पुरातत्व विभाग व संबंधित ठेकेदारास देण्यात आल्या. तसेच तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्त्वावर मालमत्ता अधिकारी नियुक्त करणे, श्रीक्षेत्र आळंदी येथे मंदिर समितीसाठी जागा उपलब्ध करून घेणे, सन 2025 मधील ‘श्रीं’च्या पूजा ऑनलाइन बुकिंग करणे, निर्माल्यापासून धूप-अगरबत्ती तयार करण्याबाबत थर्ड वेव्ह टेक्नॉलॉजीज, पुणे यांनी कोणत्याही स्वरूपाची कार्यवाही न केल्याने प्रस्ताव रद्द करून ऋषिकेश भट्टड, पंढरपूर यांचा प्रस्ताव योग्य त्या अटी व शर्तीवर मंजुरी देण्यात आली आहे. बैठकीत आदी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.
तसेच अनंत अरुण माळवदकर, गुरुदत्त अभिमन्यू क्षीरसागर, संकेत अशोक कोले, स्नेहा अमोल वाडेकर इत्यादी कर्मचाऱ्यांना अनुकंपा तत्त्वावर मंदिर समितीमध्ये नोकरी देऊन नियुक्तिपत्रे वाटप करण्यात आली. त्याचबरोबर वेदांता व व्हिडीओकॉन भक्तनिवास येथील उपाहारगृहाचे भूमिपूजन करण्यात आले व दैनंदिनी 2025 चे प्रकाशनदेखील करण्यात आले. कार्यालयीन कामकाज गतिमान करण्याच्या दृष्टीने विविध संगणक प्रणाली टीसीएस कंपनीकडून मोफत उपलब्ध करून घेणे व शिर्डी व शेगाव देवस्थानमधील कार्यालयीन कामकाज, कामकाजासाठी केलेल्या अत्याधुनिक साधनांचा वापर, भाविकांच्या सेवासुविधांची माहिती घेण्यासाठी मंदिर समितीच्या आस्थापनेवरील अधिकारी, पदाधिकारी व वरिष्ठ कर्मचाऱ्यांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात येणार असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले.