सलाम मुंबई पोलीस! अचूक नियोजन, तगडा बंदोबस्त अन् जबरदस्त सुरक्षा कवचामुळे विजययात्रा उत्साहातच

मरीन ड्राइव्ह ते वानखेडे स्टेडियम अशी विश्वविजेत्या हिंदुस्थानी संघाची डोळ्यांचे पारणे फेडणारी विजयी मिरवणूक लाखो चाहत्यांच्या उत्साहात पार पडली. मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर या सोहळ्यासाठी लाखोंचा जनसागरच उसळला होता. हाथरसची दुर्दैवी घटना ताजी असताना गुरुवारची गर्दी मनात धडकी भरवणारी होती. परंतु देवाच्या रूपात साक्षात मुंबई पोलीस खंबीरपणे उभे राहिल्याने सर्वकाही सुरळीत पार पडले. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या कामगिरीवर नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव व आभार व्यक्त होत आहेत.

विश्वविजेत्या हिंदुस्थानी संघाचे अभिनंदन करण्यासाठी गुरुवारी दुपारपासून चाहत्यांनी नरिमन पॉइंट येथे हजेरी लावण्यास सुरुवात केली होती. लहानग्यांपासून आबालवृद्धांपर्यंत लाखो चाहते समुद्रकिनाऱ्यावर जमले होते. वानखेडे स्टेडियम 33 हजार चाहत्यांनी खचाखच भरल्यानंतरही हजारो चाहत्यांनी मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम यादरम्यान तोबा गर्दी केली होती. लाखो चाहते एकाच ठिकाणी एकवटल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडण्याची भीती होती. चाहते जल्लोष करण्याच्या मूडमध्ये होते. बेभान होऊन जो तो आनंद लुटत होता. परंतु मुंबई पोलिसांचे अचूक नियोजन, तगडे सुरक्षा कवच आणि योग्य मार्गदर्शनामुळे चाहत्यांना मनसोक्त आनंद लुटता आला. एवढी गर्दी असूनही चोरीच्या घटना घडल्या नाहीत. चेंगराचेंगरी होण्यासारखी परिस्थिती असतानाही जाँबाज मुंबई पोलिसांमुळे तसे काही होऊ शकले नाही.

 अफाट गर्दी आणि मोजकेच पोलीस बळ तरीही….

अफाट गर्दी आणि तुलनेत मोजकेच पोलीस बळ असे चित्र होते. परंतु अधिकारी-कर्मचाऱ्यांनी वाखाणण्याजोगे कर्तव्य बजावले त्यामुळेच आम्ही हा विजयोत्सव खऱ्या अर्थाने एन्जॉय करू शकलो. हा ऐतिहासिक क्षण ‘याचि देही याचि डोळा’ अगदी सुरक्षितपणे अनुभवू शकलो, अशा शब्दांत मुंबईकरांनी पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करत आभार मानले.

सहकाऱ्यांनो, तुमचा अभिमान अन् मुंबईकरांनो धन्यवाद!

मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत गुरुवारी झालेल्या विजययात्रेमध्ये तुम्ही केलेले व्यवस्थापन आणि कर्तव्याप्रती दाखवलेले समर्पण वाखण्याजोगे होते. सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मला अभिमान वाटतो, अशा शब्दांत पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सहकाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. वेल डन म्हणत फणसळकर यांनी विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती व अन्य आधिकाऱ्यांचे कौतुक केले. तसेच मुंबईकरांनी केलेल्या सहकार्याबाबत आभार मानले.