दहावी फेरपरीक्षेसाठी आजपासून अर्ज करता येणार

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने जुलैमध्ये दहावीची फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन परीक्षा अर्ज करण्यास 31 मेपासून सुरुवात होणार आहे. पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र मिळालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी, आयटीआय विषय घेऊन परीक्षा देणारे विद्यार्थी परीक्षाअर्ज भरू शकतात.

नियमित शुल्कासह परीक्षाअर्ज भरण्यासाठी 31 मे ते 11 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर 12 ते 17 जूनपर्यंत विलंब शुल्क भरून विद्यार्थ्यांना परीक्षेचा अर्ज भरावा लागेल. परीक्षा अर्ज भरण्यासाठी www.mahahsscboard.in या वेबसाईटवर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे. सदर परीक्षा अर्ज विद्यार्थ्यांनी शाळांमार्फतच भरावीत. परीक्षाअर्ज भरण्याच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही, अशा सूचनाही ओक यांनी दिल्या आहेत.