वसईच्या गालावर सफरचंदाची लाली, शेतकऱ्यांना मिळणार उत्पन्नाचा नवा स्त्रोत

केळी आणि सोनचाफ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या वसईच्या गालावर आता सफरचंदाची लाली खुलली आहे. जम्मू कश्मीर आणि हिमाचल प्रदेशात पिकणारे सफरचंद चक्क वसईत पिकले आहे. एका महिलेने केलेला हा प्रयोग यशस्वी झाला असून सफरचंदाचे हे झाड पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. शित कटिबंधात येणारे हे झाड समशितोष्ण कटिबंधात वाढून त्याला फळेही आल्याने वसईतील शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा एक नवा स्त्रोत निर्माण होणार आहे.

आपल्या देशात सफरंचदाचे उत्पादन प्रामुख्याने जम्मू कश्मीर आणि हिमाचल प्रदेशसह हिमालयाच्या कुशीत असलेल्या थंड प्रदेशात घेतले जाते. परदेशातूनही मोठ्या प्रमाणात सफरचंदाची आयात केली जाते. मात्र हेच महागडे फळ समशितोष्ण कटिबंधात पिकवण्याचा प्रयोग वसई येथील लंबवाडी येथे राहणाऱ्या जॉयसी फरेल यांनी यशस्वी केला आहे.

वर्षभरापूर्वी जॉयसी यांच्या मूळगावी त्यांच्या मोठ्या बहिणीने सफरचंदाची 10 रोपे बनवली होती. त्यातले एक रोप बहिणीच्या मार्गदर्शनाखाली जॉयसी यांनी आपल्या अंगणात लावून त्याचे संगोपन केले. त्यानंतर काही महिन्यांतच सफरचंदाचे झाड सुमारे नऊ फूट उंच झाले. एप्रिल-मे महिन्यात जॉयसी यांनी या झाडाची खाणणी केली. त्यांनी झाडाला एलोविरा जेल लावले. या प्रक्रियेनंतर काही महिन्यातच या झाडाला फुले आली.

सफरचंद हे थंड प्रदेशात पिकते. त्यामुळे ही फुले गळून जातील अशी सर्वांची भावना होती. मात्र फुलांनंतर या झाडाला चक्क सफरचंद लागले आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या झाडावर लागलेली सफरचंदाची फळे आता परिपक्व झाली आहेत. ती कश्मीरमधील सफरचंदासारखीच सुंदर दिसतात. त्यांची चवही गोड आहे.

जास्त पाण्याची गरज नाही

घराजवळील बागेत हे सफरचंदाचे झाड लावले आहे. या झाडाची विशेष वेगळी अशी निगा राखण्यात आलेली नाही. बागेतील अन्य झाडांप्रमाणे याही झाडाचा संभाळ करण्यात आला आहे. या झाडाला यंदा प्रथम आठ फळे लागली आहेत. बहुतेक पुढील वर्षी फळांची संख्या वाढणार आहे. सफरचंदाच्या झाडाला जास्त पाण्याची गरज नाही. फक्त व्यवस्थित निगा राखणे गरजेचे आहे, अशी माहिती जॉयसी फरेल यांनी दिली आहे.