
राजस्थानमध्ये होणाऱ्या आयफा पुरस्कार सोहळ्याच्या प्रमोटर्सपैकी एक असलेली सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अपूर्वा मखीजाला आयफामधून काढून टाकण्यात आले आहे. आता तिचा अधिकृतपणे आयफा प्रमोटर्सच्या यादीत समावेश नाही. समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या ‘यूटय़ूब’ शोच्या एका भागात रणवीर अलाहाबादिया आणि अपूर्वा मखीजाच्या वादग्रस्त टिप्पणीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. 20 फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये होणाऱया आयफा सोहळ्यासाठी अपूर्वा शूटिंग करणार होती. राजपूत करणी सेनेने मात्र याला विरोध केला होता. आम्ही अश्लीलता पसरवणाऱ्यांना येथे जोड्याने मारू. ज्या क्षणी ते दाबोक विमानतळावर उतरतील तिथूनच त्यांचा बहिष्कार सुरू होईल. त्यांना विमानतळाबाहेर येऊ दिले जाणार नाही, अन्यथा त्याचे परिणाम खूप भयानक होतील आणि त्यासाठी पर्यटन विभाग जबाबदार असेल, असा इशारा राजपूत करणी सेनेने दिला होता. आयफा सोहळय़ातील राजदूतांच्या यादीतून अपूर्वा मखीजाचे नाव काढून टाकण्यात आले आहे, असे राजस्थानच्या पर्यटनमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.