क्राऊड स्ट्राईकच्या सीईओंचा माफीनामा; विमानसेवा, व्यवसाय अजूनही धिम्या गतीवर

मायक्रोसॉफ्टची विंडोज प्रणाली क्रॅश झाल्याचा परिणाम शनिवारीदेखील विमानसेवा, व्यवसायांवर होता. हळूहळू सर्व सेवा पूर्ववत होत आहेत. तरीही यंत्रणा पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी अजून थोडा वेळ लागू शकतो, असे तज्ञांनी सांगितले आहे. अॅंटीव्हायरस सॉफ्टवेअर कंपनी क्राऊड स्ट्राईकचे सीईओ जॉर्ज कुर्ट्झ यांनी संपूर्ण प्रकरणावर माफी मागितली आहे.

शुक्रवारी सकाळी विंडोज कोलमडला आणि संपूर्ण जगात हाहाकार माजला. हजारो विमाने रद्द झाली. एटीएम, बॅंका, शेअर बाजार, कॉर्पोरेट पंपन्यांचे काम ठप्प झाले. विंडोजला दुरुस्त काम करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले. विंडोजने धिम्यागतीने प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. त्यावर निर्भर असलेल्या सेवा पूर्ववत होत आहेत. जगाचा संगणकीय वेग थांबल्याने क्राऊड स्ट्राईकचे सीईओ कुर्ट्झ यांनी माफीनामा जारी केला. सर्व यंत्रणा सुरुळीत होण्यासाठी थोडा अवधी लागू शकतो. यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत, असे त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

हिंदुस्थानासह अनेक देशांना फटका

विंडोज थांबल्याचा फटका हिंदुस्थान, अमेरिका, ब्रिटन, जर्मनीसह 20 हून अधिक देशांना बसला. वैद्यकीय सेवा, बँकांचे काम थांबले होते. टीव्ही चॅनेल, रेडिओ आणि रेल्वे स्थानकांची सेवा कोलमडली होती.

न्यूझीलंडच्या संसदेवर परिणाम

न्यूझीलंडच्या संसदेतील कामकाज ठप्प झाले होते. अमेरिकेतील लोक आपत्कालीन क्रमांक 911 वर संपर्क साधू शकत नव्हते. ब्रिटनमधील अनेक दुकानात कार्ड पेमेंट सिस्टम काम करत नव्हती. पैसे न भरल्याने ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत होता.

ऑलिम्पिक समितीलाही अडचण

पॅरिस ऑलिम्पिक समितीनेही आयटी प्रणालीतील समस्या आल्याची माहिती दिली होती. अनेक देशांच्या विमानसेवा बंद झाल्याने प्रवासी विमानतळावर ताटकळले होते.