चिमुकली अन्वी केदार कंठावरून छत्रपती शिवाजी महाराजांना करणार अभिवादन

उत्तराखंड राज्यात हिमालय रांगेतील 12 हजार 500 फूट उंचीवरील ‘केदार कंठा’ शिखरावर दि. 19 फेब्रुवारी  रोजी शिवध्वज फडकावून, कोल्हापूरची पाच वर्षांची चिमुकली अन्वी अनिता चेतन घाटगे ही छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणार आहे.

शिवजयंती म्हणजे शिवविचारांचा जागर, धीरता वीरता आणि मावळ्यांचे बलिदान यांना आठवत जगण्याची निष्ठा, तसेच हाच  विचार पेरता यावा व गडकोट दुर्ग संवर्धनाचा संदेश सर्वदूर पोचविण्यासाठी अन्वीने या साहसी उपक्रमासाठी गुरुवारी (दि. 13) कोल्हापुरातून उत्तराखंडकडे कूच केली आहे. दि. 17 फेब्रुवारी रोजी केदार कंठा शिखर चढाईस सुरुवात करून, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिवशी दि. 19 फेब्रुवारी रोजी शिखरावर पोहोचून शिवध्वज फडकावत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करणार आहे.

अन्वीची आतापर्यंतची चमकदार कामगिरी 

जगातील सर्वात लहान गिर्यारोहक व वेगवान गिर्यारोहक म्हणून ओळख असलेल्या अन्वीने आतापर्यंत गिर्यारोहण क्षेत्रात 5 वर्ल्ड रेकॉर्ड, 6 आशिया बुक ऑफ रेकॉर्ड, 6 इंडिया बुक ऑफ रेकॉर्डची नोंद केली आहे. वयाच्या अवघ्या 2 वर्षे 11 महिन्यांची असताना महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसूबाई शिखरावर चढाईने वर्ल्ड  रेकॉर्ड केले. तसेच कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या राज्यांतील सर्वोच्च शिखरे कमी वयात सर केली आहेत. 62 गडसंवर्धन मोहीम राबविल्या आहेत.