बॉलीवूडला कंटाळून अनुराग कश्यप मुंबई सोडणार

गँग्स ऑफ वासेपूर’, ‘ब्लॅक फ्रायडे’सारखे वेगळ्या धाटणीचे चित्रपट बनवणारे प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी बॉलीवूड सोडण्याचे सूतोवाच केले. अनुरागने हिंदी चित्रपटसृष्टीची कार्यशैली आवडत नसल्याने मुंबई सोडून पुढील वर्षी साऊथला जायचे ठरवले. एका मुलाखतीत अनुराग म्हणाला की, आजच्या काळात मी बाहेर जाऊन कुठलाही नवीन वेगळ्या प्रकारचा चित्रपट करू शकत नाही, मी माझ्या चित्रपटांमध्ये कोणतेही प्रयोग करू शकत नाही. कारण आता सर्व काही पैशांवर आले आहे. ज्यामध्ये निर्माते  फक्त नफा आणि मार्जिनचा विचार करतात. चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्यापूर्वीच चित्रपटाची विक्री कशी होणार आणि किती नफा होणार हे सर्व काही ठरवले जाते. त्यामुळे चित्रपट बनवण्याची मजाच संपते. मी आमच्या बॉलीवूड इंडस्ट्रीबद्दल खूप नाराज आणि निराश झालोय, असे अनुराग म्हणाला.

सध्याच्या पिढीबरोबर काम करणे कठीण आहे. कारण त्यांना अभिनय करायचा नाही, पण लगेच स्टार बनायचे आहे, अशी खंत अनुरागने व्यक्त केली. बॉलीवूडमधील रिमेक ट्रेंडवर अनुरागने नाराजी व्यक्त केली. तो  म्हणाला, बॉलीवूडमध्ये फक्त रिमेक बनवले जात आहेत. चित्रपट निर्मात्यांना नवीन काही करायचे नाही. वर्कशॉपमध्ये पाठवण्याऐवजी एजन्सी  अभिनेत्यांना जिममध्ये पाठवत आहे.