बांगलादेशी घुसखोर डॉक्टर ताब्यात, दहशतवादविरोधी पथकाची थेऊरमध्ये कारवाई

कोणत्याही वैध दाखल्याशिवाय हिंदुस्थानात घुसखोरी करून थेऊर भागात राहणाऱ्या बांगलादेशी व्यक्तीला दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतले. त्याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित व्यक्ती होमिओपॅथी डॉक्टर म्हणून व्यवसाय करायचा.

हारूल पंचानन बिश्वास (53, रा. काकडे बिल्डींग, पहिला मजला, थेऊर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बांगलादेशीचे नाव आहे. याबाबत दहशतवादविरोधी पथकाचे सहाय्यक निरीक्षक अमोल विठ्ठल पवार यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी हा मूळ बांगलादेशी नागरिक असून आरोपीने कोणत्याही वैध प्रवाशी कागदपत्राशिवाय तसेच हिंदुस्थान-बांगलादेश सीमेवरील अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय देशात घुसखोरी केली. आरोपीने प्रथम कोलकाता (पश्चिम बंगाल) येथे प्रवेश केला. त्यानंतर देशातील विविध ठिकाणे फिरून तो थेऊर येथे अवैधरीत्या वास्तव्य करत होता. त्याने थेऊर परिसरात दवाखानाही थाटला. याबाबतची माहिती मिळताच दहशतवादविरोधी पथकाने थेऊर येथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे हिंदुस्थानी नागरिक असल्याबाबत कोणताही पुरावा नसताना तो घुसखोरी करून आला. बांगलादेशाचा नागरिक असतानाही त्याने हिंदुस्थानातील बनावट जन्मप्रमाणपत्र तयार केले. तसेच हिंदुस्थानातील आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक आयोगाचे कार्ड, पासपोर्ट, रेशन कार्ड तयार करून तो पुण्यातील थेऊर येथे वास्तव्य करताना आढळून आला. या प्रकरणी त्याच्यावर विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.