नांदगावात आणखी एक सुहास कांदे रिंगणात

नांदगाव मतदारसंघात शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांना शह देण्यासाठी त्यांच्या नावाचा अपक्ष उमेदवार रिंगणात उतरविण्यात आला आहे. समीर भुजबळ आणि कांदे समर्थकांमधील राड्याने मात्र या मतदारसंघातील जनता भयभीत झाली आहे.

या मतदारसंघात शिंदे गटातर्फे आमदार सुहास कांदे, तर अजित पवार गटाचे बंडखोर माजी खासदार समीर भुजबळ हे अपक्ष उमेदवार आहेत. मंगळवारी सुहास बाबुराव कांदे नावाच्या आणखी एकाने अपक्ष अर्ज दाखल केला. त्याला तहसील कार्यालयात रोखण्याचा प्रयत्न झाला. यावेळी दोन्ही गटातील समर्थक आमनेसामने आले. या राड्याने सामान्य जनतेत भीती निर्माण झाली आहे. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर सशस्त्र पोलीस बंदोबस्तात समीर भुजबळ यांच्यासमवेत नामसाधर्म्य असलेल्या कांदे आडनावाच्या या अपक्ष उमेदवाराला सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. कुठल्याही परिस्थितीत या उमेदवाराची माघार घेवू द्यायची नाही, यासाठी भुजबळ गटाकडून फिल्डिंग टाईट करण्यात आली आहे.