चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ शिकारी टोळी प्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. मेघालय राज्यातील शिलॉंग येथून निंग सॅन लून या महिलेला अटक करण्यात आली आहे. ही महिला अटक करण्यात आलेल्या लालनेई संग याची सहकारी आहे. तपासादरम्यान शिकारी राजगोंड याचा परिवार आणि लालनेईसंग यांच्यात प्राथमिक तपासात सुमारे 5 कोटींहून अधिक रकमेचे आर्थिक व्यवहार आढळले आहेत.
या टोळी प्रकरणात कुख्यात वाघ तस्कर-शिकारी अजित राजगोंड याच्यासह त्याच्या साथीदार 5 महिला, माजी सैनिक लालनेई संग, सोनू सिंग यांना आज न्यायालयासमोर हजर केल्यावर न्यायालयाने त्यांना 20 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या वाईल्डलाईफ क्राईम कॅट्रोल ब्युरो आणि वनविभागाची 5 सदस्यीय टीम प्रकरणाचा राज्याबाहेरील तपास करत असून वनविभागाच्या 12 सदस्यीय अधिकारी पथकाने राज्यातील तपास चालविला आहे.
बहेलिया टोळीतील सात आरोपींना न्यायालयीन कोठडी
चंद्रपूर जिल्ह्यातील वाघाच्या शिकारप्रकरणी कुख्यात बहेलिया टोळीतील अजित पारधी या म्होरक्यासह 6 आरोपींना जेरबंद केल्यानंतर तपासात नवनवे खुलासे समोर येत आहेत. या टोळीने महाराष्ट्रासह मध्य भारतात वाघांच्या शिकारी करून अवयवांची विक्री केल्याचे उघड झाले. या टोळीचे आंतरराष्ट्रीय संबंध व त्यांच्यातील कोट्यवधींचा आर्थिक व्यवहारही समोर आला. या आरोपींची वन कोठडी संपुष्टात आल्यानंतर त्यांना राजुरा येथील न्यायालयात हजर करून पुन्हा वन कोठडी मागण्यात आली. मात्र न्यायालयाने 20 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे सर्व सातही आरोपींची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली.