अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अकोल्यातून एका 26 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव सुमित वाघ, असे आहे. त्याच्यावर आरोपींना पैसे पोहोचवल्याचा आरोप आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना मुंबईत आणण्यात येत असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
अमित वाघ याच्यावर नरेश कुमार आणि इतर सहकारी सूत्रधार रुपेश मोहोळ आणि हरीशकुमार यांना पैसे हस्तांतरित करणे, यासह गुन्ह्यांचा आरोप आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासात असे समोर आले आहे की, पंजाबमध्ये अटक करण्यात आलेला संशयित आकाशदीप गिल याने मुख्य सूत्रधार अनमोल बिश्नोईसह इतर आरोपींशी संपर्क साधण्यासाठी एका मजुराच्या मोबाईल हॉटस्पॉटचा वापर केला होता.
कुख्यात गुंड अनमोल बिश्नोई याने रचलेल्या हत्येच्या कटातील लॉजिस्टिक समन्वयक म्हणून गिलची ओळख पटली हे. तपासाअंती मुंबई गुन्हे शाखेने सांगितले की, आरोपींनी बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण घडवून आणण्यासाठी काही पद्धती शोधून काढल्या होत्या, जेणेकरून मारेकरी आणि सूत्रधारांना पकडता येऊ नये. याबाबत माहिती देताना पंजाबच्या फाजिल्का येथून अटक करण्यात आलेल्या आकाशदीप गिलने चौकशीदरम्यान एका मजुराच्या मोबाईल हॉटस्पॉटचा वापर करून मुख्य सूत्रधारांशी संपर्क कसा साधला हे पोलिसांना सांगितलं आहे.
गिलने सांगितलं की, पोलिसांपासून वाचण्यासाठी ही पद्धत वापरली जात होती. गिलने बलविंदर नावाच्या मजुराचे हॉटस्पॉट वापरल्याचे कबूल केले आहे. आरोपीना कोणीही ट्रक करू नये म्हणून त्यानी या पद्धतीचा वापर केला असल्याचं गिलने सांगितलं. गुन्हे शाखा सध्या गिलच्या मोबाईलचा शोध घेत असून, त्यात या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाचे पुरावे असू शकतात.