विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या आमदारकीला आव्हान; बाजू मांडण्यासाठी हायकोर्टाकडून चार आठवड्यांची मुदत

महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या आमदारकीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर बुधवारी सकाळी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने मागील सुनावणीवेळी बनसोडे यांना हजर राहण्यासाठी शेवटची संधी दिली होती. त्यानुसार बनसोडे यांच्यातर्फे अ‍ॅड. मयूर गोविंद सानप यांनी उच्च न्यायालयात हजर राहून निवडणूक याचिकेवर उत्तर सादर करण्यासाठी मुदत मागितली. त्यांची विनंती मान्य करीत न्यायमूर्ती गौरी गोडसे यांनी अण्णा बनसोडे यांना निवडणूक याचिकेवर सविस्तर बाजू मांडण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ दिला आहे.

अण्णा बनसोडे हे अजित पवार गटाच्या तिकिटावर पुण्यातील पिंपरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. प्रतिस्पर्धी उमेदवार सुलक्षणा धर यांनी बनसोडे यांच्या विधानसभा निवडणुकीतील विजयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंनी मालमत्ता लपवली, हायकोर्टात आमदारकीला आव्हान; उद्या सुनावणी

अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे हे पिंपरी विधानसभा मतदारसंघातून गेल्या वर्षी निवडून आले. निवडणूक लढवण्यापूर्वी निवडणूक आयोगाकडे त्यांनी संपत्ती तसेच मालमत्तेची माहिती प्रतिज्ञापत्रावर सादर केली. मात्र, हवेली तालुक्याच्या चिखली येथील गट क्रमांक 1593 हा 1.34 कोटींचा भूखंड, गट क्रमांक 1596 हा 91 लाख रुपये किमतीचा भूखंड तसेच वन सिद्धार्थ मागासवर्गीय गृहसंस्थेची माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केली नसल्याचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) उमेदवार सुलक्षणा धर यांनी हायकोर्टात अ‍ॅड. स्नेहा भांगे व अ‍ॅड. स्वप्नील सांगळे यांच्यामार्फत निवडणूक याचिका केली आहे.