अंजुमन, मॉडर्न, अल बरकत उपांत्य फेरीत

अंजुमन इस्लाम (इंग्लिश), अल बरकत (इंग्लिश) आणि मॉडर्न इंग्लिश शाळेने निर्णायक विजयासह हॅरिस शील्ड आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. तसेच पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर ज्ञानदीप सेवा मंडळानेही अंतिम चौघांत स्थान मिळवले. आता येत्या 9 ते 11 डिसेंबरदरम्यान मॉडर्न-ज्ञानदीप आणि अल बरकत-अंजुमन इस्लाम यांच्यात उपांत्य फेरीची लढत रंगेल. अंतिम सामना 16 ते 18 डिसेंबरदरम्यान ब्रेबर्न स्टेडियमवर खेळविला जाईल.

आज सुपर लीगच्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात अंजुमन इस्लाम (इंग्लिश) शाळेने माटुंगा प्रीमियर शाळेचा डाव आणि 103 धावांनी पराभव केला. क्रिश उपाध्यायच्या नाबाद 100 धावांच्या खेळीमुळ अंजुमनने 9 बाद 346 धावांवर आपला डाव घोषित केला. त्यानंतर अंजुमनच्या फिरकीवीर अब्दुररहमान खानने 45 धावांत अर्धा संघ गारद करत माटुंगा प्रीमियरचा दुसरा डाव 126 धावांतच संपवत सामना जिंकला. पहिल्या डावातही माटुंगा प्रीमियरला 117 धावांत गुंडाळले होते. तसेच मॉडर्न इंग्लिश शाळेने अंजुमन इस्लामचा (उर्दू) 7 विकेट्सनी पराभव केला.

सोमवारी अंजुमन उर्दूचा पहिला डाव 130 धावांत आटोपला होता, तर मॉडर्नला त्यांनी 111 धावांत गुंडाळत 21 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर अंजुमनचा दुसरा डाव 102 धावांत संपुष्टात आणला. त्यामुळे मॉडर्नला विजयासाठी 122 धावांची गरज होती आणि त्यांनी सुधन सुंदरराजच्या नाबाद 51 धावांमुळे 3 फलंदाजांच्या मोबदल्यातच विजयी लक्ष्य गाठले. पहिल्या डावात 60 धावांची आघाडी घेणाऱ्या जनरल एज्युकेशनला अल बरकतकडून 20 धावांनी हार सहन करावी लागली.

दुसऱ्या डावात अल बरकतने 152 धावा करत जनरल एज्युकेशनसमोर 93 धावांचे लक्ष्य ठेवले होते. अल बरकतच्या नितेश शोनेने 44 धावांत 6 विकेट घेत प्रतिस्पर्ध्यांचा डाव 72 धावांतच संपवत थरारक विजय नोंदविला. ज्ञानदीप सेवा मंडळाने पहिल्या डावात घेतलेल्या आघाडीच्या जोरावर पराग इंग्लिश शाळेवर मात करत उपांत्य फेरी गाठली.