आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अंजुमन इस्लाम सर्व बाद 267

हमझा खान (64) आणि शाहिद खान (50) यांच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर अंजुमन इस्लाम इंग्लिश शाळेने मॉडर्न इंग्लिश शाळेविरुद्धच्या हॅरिस शिल्ड आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सर्व बाद 267 धावा केल्या. तीन दिवसीय अंतिम सामन्यात पहिला डाव 80-80 षटकांचा, तर दुसरा डाव 40-40 षटकांचा खेळविला जाणार आहे.

आज स्पर्धेच्या अंतिम सामन्याची नाणेफेक प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते बमन इराणी यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी मुंबई शालेय क्रीडा संघटनेच्या क्रिकेट खेळाचे सचिव नदीम मेमन उपस्थित होते. अंतिम सामन्यातील सर्व खेळाडूंना एसजीच्या वतीने टी शर्ट आणि कॅपचे वितरण करण्यात आले. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या अंजुमनला सलामीवीर हमझा खानने दमदार सलामी दिली. त्याने 122 चेंडूंच्या खेळीत 10 चौकार लगावत 64 धावांची खेळी साकारली. शाहिद खाननेही 60 चेंडूंत 50 धावा ठोकत संघाची धावसंख्या दोनशेपार नेली. मॉडर्न शाळेकडून विवान जोबानपत्राने 71 धावांत 4 विकेट घेत अंजुमनचा डाव पहिल्या दिवसाचा खेळ संपता संपता संपवला.

संक्षिप्त धावफलक ः अंजुमन इस्लाम (प. डाव) – 79.1 षटकांत सर्व बाद 267 (हमझा खान 64, शाहिद खान 50, अब्दुररहमान खान 34, विवान जोबनपुत्रा 4/71).