आंजर्ले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्याने बांधलेल्या इमारतीत ओपीडीच्या प्रतिक्षेत रूग्ण

आंजर्ले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीचे बांधकाम हे सप्टेंबर 2019 मध्ये सुरू करण्यात आले होते. मात्र 4 वर्ष होत आली तरी अजूनही इमारतीचे बांधकाम हे अपुर्णच आहे. त्यामुळे आंजर्ले प्राथमिक आरोग्य केंद्रात आपले आरोग्यमान तपासण्यासाठी येणा-या रूग्णांसह गरोदर माताना अपु-या जागेमुळे खुपच त्रास सहन करावा लागत आहे.

दापोली तालूक्यात आंजर्ले येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत नव्याने बांधण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 1 कोटी 20 लाख रूपये मंजूर झाले. या मंजूर झालेल्या विकास निधीतील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या बांधकामाचा भुमीपूजन सोहळा कार्यक्रम सप्टेंबर 2019 मध्ये मोठया दणक्यात संपन्न झाला. सप्टेंबर 2019 ते 21जुलै 2024 पर्यंतच्या जवळपास 46 महिन्याच्या प्रदिर्घ अशा कालावधीत अद्यापही प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी बांधण्यात येणाऱ्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेले नाही याचा परिणाम येथील आरोग्य यंत्रणेवर होत आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका झालेल्या नसल्याने जिल्हा परिषद पंचायत समितीवर प्रशासकिय राजवट आहे त्यामुळे खरे तर यांना जाब विचारणारे कोणीच लोकप्रतिनिधी नाहीत त्यांचे तेच आहेत. याचा खरं तर ते गैरफायदा उठवत आहेत. त्यात लोकांच्या जीवनाशी निगडीत असलेला आरोग्यासारख्या महत्वाच्या अशा प्रश्नाकडे आमदार आणि खासदार यांच्या सारख्या सजग लोकप्रतिनिधींचेही झालेले दुर्लक्ष यामुळे जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांचे आणखीनच चांगले फावले आहे.

आंजर्ले प्राथमिक आरोग्य केंद्राला आंजर्ले, मुर्डी, सुकोंडी, बोरथळ, सातांबा, कोंगळे, देहेण, राजापूर, पिचडोली, चांदिवणे, दलखण, वेळवी, कलानगर, रेवली, कादिवली, साकुर्डे, धानकोळी, बांधतिवरे, ताडील, आवाशी, कुडावळे, गणपतीपुळे, टांगर, शिरसोली, शिरशेश्वर अशी एकुण 25 महसुली गावे जोडलेली आहेत. आंजर्ले प्राथमिक आरोग्य केंद्रापासून काही काही गावे तर 20 किमी अंतरापेक्षाही अधिक लांबीच्या अंतरावरील दुरची गावे आहेत. एवढया लांबून आपले आरोग्यमान तपासण्यासाठी येणा-या रूग्णांना येथील वैदयकिय अधिकारी अगदीच जेमतेम जागेत मागील 46 महिने रूग्णांना तपासण्याचे सोपस्कर पार पाडत आहेत. तसेच छोटया जागेत प्रशासकिय कारभार चालत आहे यामुळे एकुणच यंत्रणेवर ताण पडत आहे. त्याचा परिणाम हा रूग्णांवर होत आहे त्यामुळे आणखीन किती कालावधीच्या प्रतिक्षेनंतर नव्या इमारतीत रूग्ण तपासणी केली जाईल असे येथे आरोग्य तपासणीला नियमित तसेच काही आजाराच्या निमित्ताने येणारे रूग्ण विचारत आहेत.