
सामान्य माणूस असणं गुन्हा आहे, मंत्री असल्यास सगळी यंत्रणा कामाला लागते, असं म्हणत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, यासाठी धनंजय देशमुख यांनी मस्साजोग येथे अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. यावरच आपली प्रतिक्रिया देताना X वर एक पोस्ट करत त्या असं म्हणाल्या आहेत.
आपल्या पोस्टमध्ये अंजली दमानिया म्हणाल्या आहेत की, ”आज मस्साजोगच्या सगळ्या ग्रामस्थांना अन्नत्याग आंदोलन करताना बघून खूप दुःख होतंय. सामान्य माणूस असणं गुन्हा आहे. तुम्ही मंत्री-संत्री असाल तर सगळी यंत्रणा कामाला लागते. तुम्ही साधे सरपंच असाल तर तुमच्या परिवारला न्याय मागण्यासाठी अन्नत्याग आंदोलन करावं लागतं. आज तागायत पोलिसांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन महाराष्ट्राला माहिती दिली नाही, 3 महिने होत आले तरी एक आरोपी सापडत नाही.” तपास किती अयोग्य पद्धतीने झाला याची माहिती तरी मुख्यमंत्र्यांना आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.