घोटाळा करणारा व्यक्तीच ठरवणार राजीनामा द्यायचा की नाही तर, सगळ्या यंत्रणा बंद करा – अंजली दमानिया

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी होत आहे. यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यायचा की नाही, हे स्वतः धनंजय मुंडे यांनी ठरवावं, असं वक्तव्य पुण्यात पत्रकारांशी बोलताना केलं. त्यांच्या याच वक्तव्यावर सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी टीका केली आहे. घोटाळा करणारा व्यक्तीच ठरवणार राजीनामा द्यायचा की नाही तर, सगळ्या यंत्रणा बंद करा, असं त्या म्हणाल्या आहेत.

अंजली दमानिया म्हणाल्या की, ”अजित पवार जे म्हणाले, ते एकूण पुन्हा एकदा धक्का बसला. त्यांचं असं म्हणणं होतं की, धनंजय मुंडे यांनी ठरवावं त्यांनी राजीनामा द्यायचा की, नाही. असचं असेल तर सगळ्या यंत्रणा बंद करून टाकाव्यात. चौकशीही बंद करून टाकावी. पोलिसांसह सगळ्या यंत्रणांना आता आराम द्यावा. जो दहशत करतो, जो घोटाळे करतो, तो ठरवेल त्याचा राजीनामा घ्यायचा की नाही. हे पक्ष, मुख्यमंत्री नाही ठरवणार, मंत्रिपदाचा राजीनामा त्याने द्यायचा की, नाही हे तो व्यक्ती ठरवणार.”

दमानिया म्हणाल्या की, आतापर्यंत आम्ही जे सगळं मांडलं आहे, ते मुद्देसूद मांडलं आहे. प्रत्येक गोष्टीचे पुरावे दिले आहेत. या सगळ्या गोष्टींची चौकशी करायची सोडून तुम्ही आज जर मनात असाल की राजीनाम्याचं त्यांना ठरू दे, तर हे हास्यास्पद आहे.”