
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या गेल्या काही काळापासून मंत्री धनंजय मुंडे यांच्या भ्रष्टाचारीच प्रकरणं उघडकीस आणत आहेत. नुकताच त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कृषी घोटाळ्याचा आरोप केला होता. यामुळे अजित पवार गटाकडूनही अंजली दमानिया यांना प्रत्युत्तर दिले जात आहे. अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण यांनी त्यांच्यावर 25 खोके घेतल्याचा आरोप केला आहे. यामुळे अंजली दमानिया भडकल्या असून त्यांनी माझी सगळीच्या सगळी खाती सरकारने तपासावी असे थेट आवाहान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनाच केले आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करण्यासाठी रिचार्जवाल्या ताईच्या खात्यावर 25 खोक्याचा बॅलन्स टाकण्यात आला आहे. काहीही काम न करता वर्षाला पंधरा देश फिरणाऱ्या, अडीच कोटी टॅक्स भरणाऱ्या स्वयंघोषित समाजसेविका ताई कोणाच्या माध्यमातून तुमचा रिचार्ज झाला ते पुराव्यासह लवकरच जाहीर करणार असा इशारा सूरज चव्हाण यांनी दिला. यानंतर अंजली दमानिया यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला.
खूप राग आला आहे तरीही मी माझ्या भाषेची पातळी सोडणार नाही.
आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजित पवारांना माझा थेट आवाहन. ताबडतोब माझी सगळीच्या सगळ्या खाती सरकारने तपासावी. कुठेही एक दमडी देखील unaccounted आहे का ते पाहावे.
इतका अमाप भ्रष्टाचार होतोय… pic.twitter.com/8jwcS5egJD
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) February 21, 2025
खूप राग आला आहे तरीही मी माझ्या भाषेची पातळी सोडणार नाही. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांना माझे थेट आवाहन. ताबडतोब माझी सगळीच्या सगळ्या खाती सरकारने तपासावी. कुठेही एक दमडी देखील unaccounted आहे का ते पाहावे, असे आव्हान अंजली दमानिया यांनी दिले.
इतका अमाप भ्रष्टाचार होतोय आणि मी लढू नये? स्वतःच्या जीवाची पर्वा ना करता लढणाऱ्या लोकांचा असा मानसिक छळ करणार? राजकारणात पुढे जाण्यासाठी, नेत्याला खुश करण्यासाठी खालच्या पातळीला जाऊन हे बोलतात ना? योग्य आहे हे? असा सवाल त्यांनी केला.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांही माझी विनंती, माझी ताबडतोब चौकशी करावी. माझे सगळ्या खात्यांची ताबडतोब चौकशी करावी. होऊन जाऊ दे. मी भ्रष्ट असेन तर मला शिक्षा झाली पाहिजे आणि जर नसेल तर मग या सूरज चव्हाणला योग्य ती शिक्षा द्यावी, असे आव्हान दमानिया यांनी दिले.