ताबडतोब माझी सर्व बँक खाती सरकारने तपासावी, सूरज चव्हाणांच्या आरोपांवर अंजली दमानियांचं प्रत्युत्तर

अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करण्यासाठी रिचार्ज वाल्या ताईच्या खात्यावर 25 खोक्याचा बॅलन्स टाकण्यात आला आहे. काहीही काम न करता वर्षाला पंधरा देश फिरणाऱ्या अडीच कोटी टॅक्स भरणाऱ्या स्वयंघोषित समाजसेविका ताई कोणाच्या माध्यमातून तुमचा रिचार्ज झाला, असा आरोप त्यांनी केला आहे. याच आरोपांना अंजली दमानिया यांनी प्रत्युत्तर दिलं.

X वर पोस्ट करत अंजली दमानिया म्हणाल्या आहेत की, ”खूप राग आला आहे तरीही मी माझ्या भाषेची पातळी सोडणार नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजित पवारांना माझं थेट आवाहन आहे, ताबडतोब माझी सगळीच्या सगळ्या खाती सरकारने तपासा. एक दमडीदेखील बेहिशेबी आहे का ते पाहा. इतका अमाप भ्रष्टाचार होतोय आणि मी लढू नये? स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लढणाऱ्यांचा मानसिक छळ करणार?”

त्या पुढे म्हणाल्या, ”राजकारणात पुढे जाण्यासाठी, नेत्याला खूश करण्यासाठी खालच्या पातळीला जाऊन हे बोलतात, हे योग्य आहे का? होऊन जाऊ दे. मी भ्रष्ट असेन तर मला शिक्षा झाली पाहिजे आणि जर नसेल तर मग ह्या सूरज चव्हाण ला योग्य ती शिक्षा द्यावी.”