![anjali damania](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/anjali-damania-1-696x447.jpg)
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज दोन महिने पूर्ण झाले आहेत. मात्र अद्यापही या प्रकरणातील मुख्य आरोपींनपैकी एक असलेल्या कृष्णा आंधळे याला अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही, तो अद्यापही फरार आहे. यातच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास योग्य होणार का? या प्रकरणी खूप काही लपवलं जातंय, असं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या आहेत. X वर एक पोस्ट करत त्यांनी याप्रकरणी पोलिसांच्या तपासात स्कॉर्पिओत आढळलेल्या मोबाईलच्या फॉरेन्सिक रिपोर्टचं काय झालं? असा सवालही उपस्थित केला आहे.
काय म्हणाल्या अंजली दमानिया?
X वर पोस्ट अंजली दमानिया म्हणाल्या आहेत की, ‘9 तारखेला काळ्या स्कॉर्पिओ गाडीतून 2 मोबाईल मिळाले होते. त्यात एका बड्या नेत्याचा फोन आला होता, अशी बातमी माध्यमांनी दाखवली होती. तो मोबाईल डेटा रिट्रीव करण्यासाठी फॉरेन्सिकमध्ये पाठवण्यात आला होता, आता 2 महिने झाले. कधी मिळणार तो डेटा ? कधी कळणार त्या नेत्यांचे नाव? आणि त्यांना वाचण्यासाठी कराड सुद्धा सुटणार, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
दमानिया म्हणाल्या की, 19 जून रोजी सातपुडा या शासकीय बंगल्यात आवदा कंपनी बरोबर 3 कोटीचा व्यवहार झाला, असे सुरेश धस म्हणाले होते. मग त्यात पुढे काय चौकशी झाली? काय स्टेटमेंट घेतली? अवादाच्या कर्मचाऱ्यांचे स्टेटमेंट घेतली का? मग धनंजय मुंडे यांच्यावर का गुन्हा झाला नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आपल्या पोस्टच्या शेवटी त्यांनी देशमुख कुटुंबियांना न्याय मिळणार का? असा सवाल विचारला आहे.
स्व संतोष देशमुख यांचा तपास योग्य होणार का? खूप काही लपवलं जातय अस वाटतंय
९ तारखेला काळ्या स्कॉर्पिओ गाडीतून २ मोबाईल मिळाले होते. त्यात एका बड्या नेत्याचा फ़ोन आला होता अशी बातमी माध्यमांनी दाखवली होती. तो मोबाईल डेटा रिट्रीव करण्यासाठी फॉरेंसिक मधे पाठवण्यात आला होता, आता २… pic.twitter.com/A9Q42JUg5M
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) February 9, 2025