वाल्मीक कराडला वाचवण्यासाठी पोलिसांची मिलीभगत, विष्णू चाटेलाही दिली जेल चॉइस; दमानियांचे गंभीर आरोप

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अत्यंत अमानवी पद्धतीने हत्या करण्यात आली. खंडणीच्या प्रकरणातून हे हत्याकांड घडले. या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. सुरुवातीला या प्रकरणातील सर्व मारेकऱ्यांवर मोक्का लावण्यात आला. त्यानंतर वाल्मीक कराडवरही मोक्का कारवाई करण्यात आली. वाल्मीक कराड आणि इतर आरोपींचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. यात त्यांच्यासोबत एक पोलीस अधिकारीही दिसत आहे. हा मुद्दा गाजत असतानाच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आणखी एक खळबळजनक दावा केला आहे.

अंजली दमानिया यांनी मंगळवारी रात्री उशिरा एक ट्विट केले आहे. यात त्यांनी वाल्मीक कराडवर दाखल गुन्ह्यांची माहिती दिली. तसेच एका गुन्ह्यात एफआयआरमध्ये वाल्मीक कराडचे नाव होते, मात्र चार्जशीटमधून त्याचे नाव वगळण्यात आले. वाल्मीक कराड याला वाचवण्यासाठी ही पोलिसांची मिलीभगत होती, असा आरोप दमानिया यांनी केला आहे.

बीड, बंदूक आणि कराड – सीआयडीच्या हाती लागले सीसीटीव्ही फुटेज, कराड गँग 29 नोव्हेंबरला विष्णू चाटेच्या कार्यालयात आली होती!

काय आहे ट्विट?

ही पोलिसांची मिलीभगत! याला म्हणतात राजकीय दबाव. 3 जुलै 2024 रोजी एक एफआयआर दाखल झाला होता. अतिशय गंभीर स्वरुपाचा. त्यात देखील वाल्मीक कराड होते. चार्जशीट दाखल झाली, पण “वाल्मिक कराड” यांचे नाव वगळण्यात आले. वाह रे पठ्ठे..कारण देण्यात आले की पुराव्या अभावी वगळण्यात आले. ती FIR पाहा त्यातले सेक्शन पहा आणि कारण देखील पाहा. या केसचा पुन्हा तपास करा, असे ट्विट दमानिया यांनी केले आहे.

विष्णू चाटेला जेल चॉइस?

संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात आधी विष्णू चाटे पोलिसांच्या हाती लागला होता. विष्णू चाटे सारख्या गुन्हेगाराला जेलचा चॉइस देण्यात आला ही अतिशय धक्कादायक बाब आहे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले. विष्णु चाटेने बीड येवजी लातूर कारागृहाची मागणी का केली आणि ती त्यांची मागणी पूर्ण करण्यात आली? असा सवाल करत दमानिया यांनी काही नावेही दिले आहेत. ताबडतोब ही पूर्ण चौकशी मुंबईला हलवा आणि त्या गुन्हेगाराला पण मुंबईला आर्थर रोड जेलमध्ये ठेवा, अशी मागणीही दमानिया यांनी केली.