या राजकीय सेटिंगची किळस येते, धस आणि मुंडेंच्या भेटीवर अंजली दमानिया संतापल्या

भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेल्यानंतर राज्याचं राजकारण चांगलंच तपासलं आहे. गेल्या दोन महिन्यांपासून बीडमधील वाढलेली गुन्हेगारी, खंडणी आणि भ्रष्टाचार प्रकरणी धस हे मुंडेंवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आरोप करत होते. मात्र अचानक सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी तडजोड केली का? असा प्रश्न विरोधी पक्षातील अनेक नेते विचारत आहेत. यातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धस यांनी मुंडेंची भेट घेल्यानंतर संताप व्यक्त केला आहे. या राजकीय सेटिंगची किळस येते, असं दमानिया म्हणाल्या आहेत.

काय म्हणाल्या अंजली दमानिया?

अंजली दमानिया म्हणाल्या, ”चार ते पाच दिवसांपूर्वी मला देखील कळलं होतं की, धस आणि मुंडे यांची भेट झाली होती. ही भेट चंद्रशेखर बावनकुळे यांनी करून दिली होती. मात्र ऐकवी गोष्ट होती, म्हणून मी याविषयी बोलले नाही. मात्र आता धस यांनी हे कबूल केलं आहे आणि बावनकुळे देखील याबाबत म्हणाले आहेत. यानंतर मनाला अतिशय दुःख होत आहे, राग येतोय. या राजकीय सेटिंगची किळस येते.”

दमानिया म्हणाल्या की, यावर धस म्हणतात की, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायला गेलो होतो. त्यांचं लहानसं डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं, त्यासाठी थेट रुग्णालयात जाण्याची गरज नव्हती. त्यांना चौकशी करायची होती तर, दुसऱ्या कोणाकडून तब्येतीची विचारपूस करता आली असती. बावनकुळे जे म्हणाले, त्यांच्यात मतभेद नाही, मतभेत आहेत, हा डायलॉग ऐकून कान किटले. ही सगळी राजकीय सेटिंग बघून आता किळस येत आहे, राग येत आहे. संतोष देशमुख हे अत्यंत साधारण सरपंच होते, त्यांची निर्दयपणे हत्या झाली. यातही तुम्हाला राजकारण सुचत असेल तर, हे दुर्दैवी आहे.”