![ajit pawar and anjali damania](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/ajit-pawar-and-anjali-damania-696x447.jpg)
लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारची तिजोरीत खडखडाट आहे. या योजनेचा परिणाम राज्य सरकारच्या इतर योजनांवर पडत आहे. याचमुळे आता निवडणुकीत लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचं आश्वासन देणाऱ्या महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले आहेत. ज्यामुळे आतापर्यंत लाखो बहिणी या योजनेतून अपात्र ठरवण्यात आल्या आहेत. यावरूनच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्य सरकार आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. राज्याला दहावी पास अर्थमंत्री लाभले, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
काय म्हणाल्या अंजली दमानिया?
माध्यमांशी संवाद अंजली दमानिया म्हणाल्या की, ”दहावी पास अर्थमंत्री राज्याला लाभले असतील तर, त्यांच्याकडून आपण काहीच अपेक्षा करू शकत नाही. आपल्या घरचं बजेट असलं तर आपण आधी प्लॅनिंग करतो आणि नंतर खर्च करतो. मात्र हे सरकार आधी खर्च करतं आणि नंतर प्लान करतं.”
दमानिया म्हणाल्या की, ”गेल्या 10 वर्षांपासून अजित पवार अर्थमंत्री आहेत. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट पडणारच आहे, हे त्यांना माहित असून त्यांनी ही योजना आणली. आता ते असं म्हणत आहेत की, खडखडाट आहे म्हणून आम्हाला त्या बंद कराव्या लागत आहेत. म्हणजेच तुम्ही मते विकत घेण्यासाठी ही योजना आणली. पुन्हा मी हेच म्हणेन दहावी पास अर्थमंत्री असेल तर असचं होणार.”