महाविकास आघाडीने उमेदवारी दिली तर निवडणूक रिंगणात उतरणार, मंत्री तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत बंडाच्या तयारीत

‘महायुतीकडून लढण्याचा विचार केला तर पंढरपूर विधानसभेची जागा भाजपकडे आहे. आपण शिंदे गटाकडून उमेदवारीची मागणी केली. मात्र, विद्यमान आमदारांनाच भाजपकडून उमेदवारी मिळण्याचे संकेत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीकडून उमेदवारी मागितली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. महाविकास आघाडीने संधी दिल्यास निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी आहे,’ असे भैरवनाथ शुगरचे व्हा. चेअरमन आणि आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी सांगितले. यामुळे अनिल सावंत बंडाच्या तयारीत असल्याच्या चर्चा पंढरपुरात सुरू होत्या.

अनिल सावंत म्हणाले, ‘मी फक्त निवडणुकीपुरता ‘प्रकट’ झालो आहे असे नाही, तर मंगळवेढा भागात गेल्या दहा वर्षांपासून आपण ‘भैरवनाथ शुगर’च्या माध्यमातून कार्यरत आहोत. अनेकांच्या हाताला रोजगार मिळवून देण्याचे काम केले आहे. आणखी काम करायचे आहे. या भागात फिरताना पाणी, वीज, रस्ते, आरोग्य आदी कामे होणे गरजेचे असल्याचे दिसून येते. ही कामे करायची असतील, तर सत्तेत राहून प्रश्न मांडता येणार आहेत, हे लक्षात घेऊनच आपण मतदारसंघातील लोकांच्या भावना, मते जाणून घेत आहोत. लोक म्हणतील तर विधानसभा लढवायची की नाही, हे ठरवू. जनमत जाणून घेण्यासाठी मी गाव दौरे सुरू केले असून, लोकांचा कल महाविकास आघाडीकडे आहे, असे दिसत आहे.’

‘मी महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागितली आहे, म्हणून आरोग्यमंत्री तानाजी सावंत व अनिल सावंत या काका-पुतण्याची लढाई सुरू झाली आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. कारण डॉ. तानाजी सावंत यांचा मतदारसंघ व जिल्हा वेगळा आहे,’ असे त्यांनी सांगितले. ‘आपण मतदारसंघातील 40 गावांचा दौरा केला आहे. लोकांच्या भेटी घेतल्या आहेत. गणेशोत्सव, नवरात्रोत्सवामध्ये नागरिकांशी चांगला संपर्क होईल. यातून ताकद व लोकांची मते अजमावता येणार आहेत,’ असे अनिल सावंत म्हणाले.

मंत्री तानाजी सावंत यांचा पुतण्या म्हणून लक्ष

n अनिल सावंत हे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे पुतणे आहेत. शिंदे गट ही महायुतीमध्ये सत्तेत सहभागी आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व सध्या भाजप आमदार समाधान आवताडे करीत आहेत. महायुतीत ही जागा भाजपकडे जाणार आहे, तर शिंदे गटाकडून अनिल सावंत यांनी या जागेवर दावा केला आहे. शिंदे गटाला ही जागा मिळणार नसेल तर महाविकास आघाडीकडून अनिल सावंत यांनी लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे मंत्री तानाजी सावंत हे अनिल सावंत यांच्या उमेदवारीला मान्यता देणार की अनिल सावंत बंड करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.