उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातील मिंधे गटाचे रवींद्र वायकर यांच्या विजयासाठी ईव्हीएम हॅक केल्याचे उघड झाले आहे. रविंद्र वायकर यांचा विजय ‘मॅनेज’ करण्यासाठी मिंधे टोळी व निवडणूक अधिकाऱ्यांनी रचलेले कारस्थान जगासमोर आले असून सध्या त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. दरम्यान सोमवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे व शिवसेना नेते अॅड अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेत नेमके निकालाच्या दिवशी नेस्को येथील मत मोजणी केंद्रावर काय घडले, कशा प्रकारे यंत्रणेने कीर्तिकरांचा विजय ढापला याची माहिती दिली आहे.
”अमोल कीर्तिकर यांचा पराभव संशयास्पद आहे. सगळ्या जनतेला कळावं नेमकं काय झालं त्यासाठी ही पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत. या निकालाविरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत.या निकालातून निवडणूकीच्या प्रक्रीयेला हरताळ फासलेला आहे. प्रत्येक केंद्रावर मत मोजणीची एक फेरी पूर्ण झाली की मतांची घोषणा केली जाते. मात्र या मतदान केंद्रावर 19 व्या फेरीनंतर निवडणूकीची प्रक्रीया डावलून निकालातली पारदर्शकता बंद झाली. 19 व्या फेरीपर्यंत मतं सांगणे थांबवले व नंतर थेट 22 23 व्या फेरीला मतं जाहीर केली”, असे अनिल परब यांनी सांगितले.
कशी असते मतमोजणीची प्रक्रिया
एक लोकसभा मतदारसंघ हा सहा विधानसभा मतदारसंघ मिळून बनतो. मतमोजणी केंद्रावर एका विधानसभेला 14 टेबल असतात. प्रत्येक विधानसभेसाठी एक असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर (ARO) असतो. त्या रिटर्निंग ऑफिसरचं देखील तिथेच टेबल असतो. ARO च्या टेबलजवळच प्रत्येक पक्षाचा प्रतिनिधी उपस्थित असतो. या चौदा टेबलची मतं त्यांना नेमून दिलेल्या ARO ला दिली जातात. पक्षाच्या प्रतिनिधीसमोर ARO मतांची टॅली करतात व नंतर ती टॅली ते मुख्य रिटर्निंग ऑफिसरला पाठवले जाते व त्या मतांची घोषणा केली जाते, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.
नेस्को येथे मतमोजणी केंद्रावर काय घडले
या मतमोजणी केंद्रावर एआरओचे टेबलमध्ये व पक्ष प्रतिनिधींचे टेबल यात खूप अंतर ठेवलं होतं. दोन्ही टेबलांच्यामध्ये एक जाळी देखील होती. त्यामुळे एआरओच्या टेबलवरची मतं पक्षाच्या प्रतिनिधीला कळत नव्हती. त्यामुळे आमच्या प्रतिनिधीला प्रत्येक फेरी संपल्यानंतर मतं समजत होती. आम्हाला 19 व्या फेरीपर्यंत मतं कळायची थांबली होती. ती थेट 22 व्या व 23 व्या फेरीनंतर समजली, असे अनिल परब यांनी सांगितले.
650 मतांचा फरक
मतदान संपल्यानंतर प्रत्येक पक्षाला 17 सी फॉर्म दिला जातो. त्या फॉर्मवर प्रत्येक मतपेटीत किती मतदान झालं ते लिहलेलं असतं. त्यावर सर्व अधिकाऱ्यांची सही करून आम्हाला दिली जाते. त्यानंतर निकालाच्या दिवशी आमच्याकडील फॉर्मप्रमाणे ती पेटी आहे का? त्य़ातील मते आहेत का? ते तपासले जाते. दुसरा प्रकार असतो फॉर्म 17 C part 2. मतं मोजून झाल्यावर फॉर्म 17 C part 2 भरून द्यायचा असतो व अधिकाऱ्याने पेटीत किती मतं मोजली गेली व किती टॅली झाली ते फॉर्म 17 C part 2 मध्ये लिहून द्यायचे असते. मात्र बऱ्याचवेळा मागूनही काही फेऱ्यांनंतर आम्हाला फॉर्म 17 C part 2 दिला गेलेलाच नाही. त्यामुळे आमच्याकडे 650 मतांचा फरक आलेला आहे. 19 व्या फेरीपर्यंत मत जाहीर करायचं बंद केलं. 17 C part 2 देखील नाकारले. त्यामुळे त्यांच्या व आमच्या टॅलीत 650 मतांपेक्षा जास्त मतांचा फरक येतोय, असे अनिल परब यांनी सांगितले. तसंच तो फॉर्म 17 C part 2 आम्हाला मिळाल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्याने विचारायचं असतं की हे तुम्हाला मान्य आहे का? तसं काही विचारलं गेलं नाही. आम्ही रिटर्निंग ऑफिसरचा गोंधळ बघत होतो. रिटर्निंग ऑफिसर वारंवार बाथरुमला जात होत्या. तिथे त्या फोनवर बोलत होत्या. त्या गोष्टीची आम्हाला उमेदवार म्हणून माहिती मिळणं गरजेचं आहे. सीसीटीव्ही फुटेज मुळे यात पारदर्शकता आली असती. पारदर्शकतेची गरज आहे. त्यामुळे ते मागितले होते. सुरुवातीला आम्ही देऊ असे सांगितले त्यानंतर दोन तीन दिवसांनी देऊ सांगितले. मात्र नंतर त्यांनी न्यायालयाच्या आदेशाशिवाय देता येणार नाही असे सांगितले आहे. पारदर्शकता असेल तर सीसीटीव्ही फुटेज द्यायला हरकत नाही, असे अनिल परब म्हणाले,
”आज जो मोबाईल आतमध्ये वायकरांचे नातेवाईक पडेलकर यांनी वापरला त्याची माहिती आमच्याकडे आहे. त्यांनी कुणाला फोन केले त्याची माहिती देखील आमच्याकडे आहे. दहा दिवस या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. रिटर्निंग ऑफिसर सूर्यवंशी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी म्हटलं आहे की आम्ही एआरओला एक मोबाईल वापरायला प्राधिकृत केलेलं की. गुरव नावाच्या माणासाकडे एक मोबाईल होता. आम्ही मोबाईलच्या वापराबाबत ARO ला विचारले असता त्यांच्याकडे उत्तर नव्हते आणि हा जर नियम लागू झाला असेल तर देशातील सर्व ठिकाणी हा नियम लागू झालेला पाहिजे. त्यांनी सांगितलं की डेटा अपडेट करण्यासाठी आम्हाला ओटीपी येतो त्यानंतर आम्ही डेटा अपडेट करतो. ज्यावेळी सुरेंद्र अरोरा आणि शहा यांनी आक्षेप घेतल्यानंतर हा फोन दुपारी 2 नंतर बाहेर गेला. मग हा फोन बाहेर गेल्यानंतरचे इतर राऊंडचा डेटा कसा अपडेट केला गेला. त्यासाठी कुठला फोन वापरला. त्यासाठी कुणाला अधिकार दिले होते. या सगळ्याची माहिती आम्हाला मिळायला हवी. आमचा झालेला विजय सरकारी यंत्रणेंचा गैरवापर करून हिरावून घेतला आहे. या रिटर्निंग ऑफिसरचा इतिहास तपासून बघा. त्यांच्यावर किती गुन्हे दाखल आहेत. किती वेळा सस्पंड झाल्या आहेत. भ्रष्टाचाराची किती प्रकरणं पेंडिंग आहेत ते बघा म्हणजे सर्व लक्षात येईल, असे अनिल परब म्हणाले.