सर्वच राजकीय पक्षांचे लोक त्या बैठकीला होते – अनिल परब

वांद्रे येथील झोपडपट्टी विकास योजनेशी संबंधित वादांचाही या हत्येच्या तपासात समावेश करण्यात यावा, अशी मागणी झिशान सिद्दिकी यांनी केली आहे. वांद्रे पूर्व मतदारसंघातील संत ज्ञानेश्वर नगरमधील विकास आराखडय़ाचे सर्वेक्षण होण्यापूर्वी अनिल परब यांनी महासभेच्या ठरावासाठी तेथील रहिवाशांची बैठक बोलवली होती, असे झिशान यांचे म्हणणे आहे. मात्र ज्ञानेश्वर नगरमधील लोकांनी सर्वच राजकीय पक्षांच्या लोकांना तिथे बोलवले होते, असे अनिल परब यावेळी म्हणाले. लोकांना मदत व्हावी म्हणूनच आम्ही तिथे गेलो होतो आणि तिथे आम्ही नाही, तर लोकांनीच बिल्डरांना बोलवले होते. त्याचे रेकॉर्डिंग आहे आणि ते एसआरएच्या अधिकाऱ्यांना पाठवले जाते, असेही अनिल परब म्हणाले.

झिशान सिद्दिकी यांनी बाबा सिद्दिकींना कुख्यात छोटा शकील याने धमकी दिल्याचेही त्यावेळी माध्यमांना सांगितले होते. त्यामुळे त्याबाबतही चौकशी झाली पाहिजे. कारण या प्रकरणाशी संबंधित इतर कोणता अँगल लपवण्यासाठी ते आरोप करत असतील तर ते त्यांना सिद्धही करावे लागतील, असे अनिल परब म्हणाले.

बाबा सिद्दिकीना मी ओळखत होतो. झिशान आमदार होते. त्यामुळे त्यांनाही मी ओळखतो. पण त्यांचे काय व्यवहार आहेत हे मला माहीत नाही. एखाद्याचा खून होतो त्यामागे चार-पाच कारणे असतात. दुश्मनी असते, मालमत्तेवरून भानगड असते, पैशावरून भानगड असते किंवा बाईचे प्रकरण असते. याच्याव्यतिरिक्त खून होण्याचे काय कारण असते. त्यामुळे या खुनामागचे नेमके कारण काय हे सत्य पोलिसांनी बाहेर आणले पाहिजे. एक कारण पोलिसांनी समोर आणले आहे. त्यावर झिशान सिद्दिकी समाधानी नसतील तर त्यांनी पुन्हा चौकशीची मागणी केली पाहिजे. सरकार त्यांचेच आहे, असे अनिल परब म्हणाले.