अभिनेत्री मलायका अरोरा हिचे वडील अनिल मेहतांच्या मृत्यूचे कारण गुलदस्त्यातच आहे. पोलिसांना मेहतांचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला आहे. तसेच पोलिसांनी मेहतांच्या पत्नीचा जबाब नोंद केला आहे. मेहता कुटुंबाशी संबंधित असणाऱ्यांचा लवकरच पोलीस जबाब नोंदवणार आहेत.
अनिल मेहता हे गुडघेदुखीने त्रस्त होते. बुधवारी सकाळी अनिल हे बाल्कनीमध्ये उभे असताना पावणेअकराच्या सुमारास खाली पडले. हा प्रकार सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आला. सुरक्षा रक्षकाने आरडाओरड केल्यावर इमारतीमधील रहिवासी खाली आले. त्यानंतर मेहतांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याना मृत घोषित केले. पोलिसांनी मेहतांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
आज वांद्रे पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला आहे. शवविच्छेदन अहवालानुसार त्यांच्या शरीरावर इजा असल्याचे सूत्रांनी सांगितले. आज मेहतांचा अंत्यविधी होता. त्यामुळे पोलिसांनी आज कोणाचाही जबाब नोंदवला नाही.
डायरीमध्ये करायचे नोंदी
मेहता हे त्यांच्या डायट आणि घडामोडी हे डायरीमध्ये नोंद करत असायचे. त्या डायरीबाबतची माहिती पोलिसांना मिळाली असून त्या डायरीचा पोलीस शोध घेत आहेत.
डॉक्टरचा घेणार शोध
मेहतांच्या मृत्यूप्रकरणी पोलीस नातेवाईकाचा जबाब नोंदवत आहेतच, परंतु मेहता यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरचाही शोध घेत आहेत. डॉक्टरच्या माध्यमातून काही माहिती पोलिसांना मिळणार आहे. त्यावरून मेहतांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.