
>> प्रा. अनिल कवठेकर
मनोज कुमार हे नाव घेतल्यावर डोळ्यांसमोर येते ते देशप्रेमात आकंठ बुडालेला नायक, दिग्दर्शक आणि निर्मात्याच्या एकाहून एक सरस चित्रपटांची यादी. आपल्या देशाचे स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन या राष्ट्रीय सणांची पहाट मनोज कुमारच्या ओतप्रोत देशप्रेमाने भरलेल्या गीतांनी होते. त्या गीतातील शब्द, गायकाचा आवाज व संगीत यामध्ये देशप्रेमाची जादू मनोज कुमारच्या परिसस्पर्शाने, त्याच्या हृदयात असणाऱया देशप्रेमाच्या भावनेने आणि त्याला नेमके काय मांडायचे आहे हे माहीत असल्याने ती साध्य झाली होती. तशी जादू किंवा त्या उंचीवर घेऊन जाणारी देशभक्तीपर गीते इतर निर्मात्यांना देता आली नाहीत. ती दिली काव्यमय शैली असणाऱया मनोज कुमार यांनी.
मनोज कुमार यांना भारत कुमार असे संबोधित करण्याने त्यांच्या सृजनत्वाचे नेमकेपणे स्पष्ट होत नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकासाठी काही हक्क असतात आणि त्या हक्काबरोबर त्याची काही कर्तव्ये असतात. या देशातील लोकशाहीला सशक्त करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. आपण कोणता व्यवसाय करत आहोत याला महत्त्व नाही; पण आपण करत असलेल्या व्यवसायातून आपण आपल्या देशाची लोकशाही कशी सशक्त करू शकतो? देशातील सामान्य माणसांचे प्रश्न, त्यांचे विश्व, त्यांचे दुःख, त्यांचे दारिद्रय़, त्यांच्या समस्यांना वाचा फोडू शकतो का? तर मनोज कुमार यांनी ते शक्य केले आणि हे मनोज कुमार यांचे यश आहे.
मनोज कुमार यांनी निर्मिती केलेल्या प्रत्येक चित्रपटातील नायक हा सामान्य मध्यमवर्गीय होता आणि मध्यमवर्गाचे प्रश्न त्यांनी कायम आपल्या चित्रपटांमधून मांडले. 1972 मध्ये आलेल्या “शोर’’ चित्रपटाचा खास उल्लेख करावा लागेल. यातली गाणी अतिशय श्रवणीय आहेत जी आजही अनेक वेळा ऐकली तरी त्यातला रस कमी होत नाही. कारखान्यामध्ये काम करणारा नायक आणि चाळीमध्ये राहणारे त्याचे सामान्य कुटुंब. बोलू न शकणाऱया आपल्या मुलावर अत्यंत प्रेम करणारा हा नायक मुलाला बोलता यावे म्हणून खूप प्रयत्न करतो. दिग्दर्शनातल्या अनेक सुंदर गोष्टी या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळतात. मनोज कुमारच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये हा चित्रपट त्याच्या दिग्दर्शनामुळे मला सगळ्यात जास्त भावला होता. कोंबडय़ांचा कलकलाट, कुत्र्यांचे भुंकणे, नळावरची भांडणे, आपल्या अवतीभवती असणारे आवाज… तसे पाहिले तर हे आवाज सामान्य माणसाच्या आयुष्यातली छोटीशी घटना आहे. पण एका बापाच्या दृष्टीने हा आवाज गोंधळ आहे. कारण सगळे जग भांडत, ओरडत आहे. गोंधळ घालत आहे आणि माझा मुलगा एक शब्द उच्चारू शकत नाही? अशा एका बापाच्या हृदयातील दुःखाचा कल्लोळ म्हणजेच “शोर’’ होय! मुलगा आणि बाप यांच्या नात्यावर असलेली एक भावस्पर्शी करूणेची झालर असलेली सुंदर कविता होती. त्याच बरोबर त्या काळातल्या सामान्य वर्गाला, देशातील सरकार गरीबांच्या समस्या सोडवण्यास प्रयत्न करत नसेल तर तुम्ही हरू नका. तुम्ही प्रयत्न करत राहा. ही तुमची जबाबदारी आहे आणि एकदा तुम्ही जबाबदारी स्वीकारली की, तुमच्या मार्गात येणारे अडथळे आपोआप दूर होतील असा संदेश देणाराही होता.
चित्रपट प्रेक्षकांना प्रभावित करणारे माध्यम आहे. चित्रपट म्हणजे इतिहास नाही. वर्तमानकाळही नाही. पण त्यात असतात इतिहासाची बीजे! हे आजचा प्रेक्षकवर्ग विसरला आहे. समाज माध्यमावर त्याला हवा तो अर्थ काढायला लागलेला आहे. चित्रपट म्हणजे इतिहास असे काहीसे व्हायला लागले आहे. या देशातील केवळ उत्कृष्ट चित्रपट निर्मातेच हरवले नाहीत तर या देशातील उत्तम प्रेक्षकही आता हरवत चाललेला आहे असे म्हणावे लागेल. चित्रपट हा समाजाचा आरसा असतो. त्या आरशामध्ये तत्कालीन समाजाचे प्रतिबिंब उमटायला हवे आणि ते ज्या चित्रपटांमध्ये सहजपणे येते तो चित्रपट लोकांना आपोआप भावतो.
मनोज कुमारच्या या कल्पकतेचे वेगळेपण यासाठी उल्लेखनीय ठरते. कारण विविध मसाला पटाच्या गर्दीत मनोज कुमार यांनी आपला चित्रपट चालेल की नाही, याचा विचार न करता हळव्या नात्यांचे भावस्पर्शी विषय आणले आणि लोकांनी त्या चित्रपटांना डोक्यावर घेतले. दुष्काळ, बेरोजगारी, महागाई हे विकसनशील देशातले कायमचे प्रश्न आहेत. 1974 सालीही हे प्रश्न होते आणि आजही हे प्रश्न आहेत.
जीवनातल्या तीन मूलभूत गरजा म्हणजे रोटी, कपडा और मकान… या भोवती सामान्यांचे आयुष्य फिरते. “रोटी, कपडा और मकान’’ चित्रपटात दोन नायक शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात भटकत आहेत. नोकऱया नाहीत. वाढती महागाई. जगण्यासाठी पैसा नसल्याचे वर्णन एका गाण्यात केले आहे.
पहले मुठ्ठी मे पैसे लेकर थैला भर शक्कर लाते थे
अब थैले मे पैसे जाते है मुठ्ठी मे शक्कर आती है
या दोन ओळीतच 1974 मधील समाजाच्या व देशाच्या आर्थिक व्यवस्थेचे वर्णन समजते. ही महागाई आजही आकाशाला भिडलेली आहे. सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारे झालेले आहेतः पण तरी आपण सर्वजण या व्यतिरिक्त मंदिर आणि मशिद या प्रश्नांमध्ये अडकलेले आहोत. कारण आमचे डोळे उघडणारे साहित्य वा चित्रपट निर्मिती होत नाही. मनोज कुमार यांच्या चित्रपटातल्या गाण्यांमध्येही त्या काळातल्या सामान्यांच्या प्रश्नांचा, समस्यांचा भावार्थ येतो. पामेरा, फ्रेम वगैरेमुळे ती गाणी केवळ गाणी न राहता त्या गाण्याला त्या चित्रपटाच्या कथेचा भावपूर्ण गंध येतो आणि तो गंधच त्या चित्रपटाचे सौंदर्य वाढवतो. 1970चा काळ… देशाला स्वातंत्र्य मिळून 23 वर्षे झालेली आहेत. पण इंग्लंडच्या प्रभावामुळे बरेचजण आपला देश सोडून इंग्लंडमध्ये स्थायिक झालेत.‘पूरब और पश्चिम’’मधला नायक एका सामान्य कुटुंबातला मुलगा इंग्लंडमध्ये नोकरीसाठी जातो. तिथे भेटलेल्या हिंदुस्तानी वंशाची मुलीवर पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा आहे. त्यामुळे देशी प्रेम तिला कळत नाही. अशावेळी नायक कसा धीरोदत्त, समंजस असावा हे मनोज कुमार यांनी दाखवून दिले आहे. मनोज कुमार यांच्या ‘पूरब और पश्चिम’मधले प्रेम अध्यात्मिक पातळीवरचे वाटते. आपल्या देशाच्या संस्कृतीची ओळख आणि ती संस्कृती जपण्याचे काम मनोज कुमार यांनी आजन्म केले.
“पूरब और पश्चिम’’ची सुरुवात कृष्णधवल रंगात होते. देश स्वतंत्र होताना देशाचा तिरंगा वर सरकताना पडद्यावर दिसतो व सप्तरंग येऊ लागतात. देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या आयुष्यात सप्तरंग भरले असे मनोज कुमारमधील दिग्दर्शक सांगून जातो. स्वातंत्र्य म्हणजे सौंदर्य. स्वातंत्र्य म्हणजे सप्तरंग. स्वातंत्र्य म्हणजे मुक्तपणा. मनोज कुमारच्या दिग्दर्शनाची ही काव्यमय शैली त्याच्या चित्रपटातून अनेकदा पाहायला मिळाली आहे. परंतु त्यांनी जपलेल्या सामान्य मध्यमवर्गाचा कबिला आता पुढे घेऊन जाणारा कोणताही निर्माता वा दिग्दर्शक आज दिसत नाही. मनोज कुमार यांच्या या चित्रमय प्रवासाला मानाचा मुजरा.
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)