गुलदस्ता- देव आनंद आणि मिस सिमलाची भेट

>> अनिल हर्डीकर

चॉकलेट हिरो ही प्रतिमा जपणाऱया देव आनंद यांचा चाहतावर्ग त्यांच्या उमेदीच्या काळापासून तसाच आहे. अशीच त्यांची एक चाहती त्यांची आयुष्याची जोडीदार झाली. देव आनंद आणि मोना सिन्हा यांच्या या पहिल्या भेटीने पुढे मोना सिन्हा यांना कल्पना कार्तिक आणि मिसेस देव आनंद ही ओळख मिळवून दिली.

दिलीप कुमार- मधुबाला, राज कपूर-नर्गिस आणि देव आनंद- सुरैया ही हिंदी चित्रपटसृष्टीतली गाजलेली प्रेम प्रकरणं. आज या जोडय़ांपैकी कुणीच हयात नाही तरी त्या आठवणी इतस्ततः पसरलेल्या आहेत. देव आनंद आणि सुरैया यांचं एकमेकांवर निस्सीम प्रेम होतं. त्यांच्या प्रेमाची परिणीती लग्न बंधनात व्हावी यासाठी उभयतांच्या मित्रांनी त्यांच्याकडून खूप प्रयत्न केले. पण… ‘पण’ हा शब्द नेहमी स्वप्नांची राख रांगोळी करतो.

मुद्दई लाख बुरा (या भला) चाहे तो क्या होता है
वो ही होता है जो मंजूरे खुदा होता है

हेच खरं… सुरैयाने कबुली दिली, म्हणाली ,‘वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी मी चित्रपटसृष्टीत आले. नायकाच्या भूमिकेत मोतीलाल, के. एल. सैगल, करण दिवाण, जयराज, सुरेंन्द्र, अशोक कुमार असे कलाकार होते ते वयाने मोठे होते. राज कपूरचं लग्न झालेलं होतं. अशा वेळी देव आनंद सारखा तरुण माझ्या चित्रपटात नायक म्हणून आला. मला तो आवडला. त्यानं माझ्यावरचं प्रेम कधी लपवून ठेवलं नाही.तशी मी लाजरी होते, तरी शिष्ट ही होते. देव ही तसाच होता. सज्जन होता. सुंदर होता. पूर्वी तो अबोलच होता. मला तो देखणा वाटायचा तसाच सभ्य, सुसंस्कृत वाटायचा. तो प्रेमाची गोड कुजबुज करायचा. आमचं एकमेकांवर प्रेम असूनही लग्न झालं नाही यात सर्व दोष माझाच होता. माझी आजी कुटुंबप्रमुख होती. तिचा या लग्नाला विरोध होता. देव थांबायला तयार होता; पण माझ्या घरच्यांचा विरोध होता. माझं मन गुरफटावं तसं झालं. तो क्षण चुकला आणि देवला माझ्या भावना समजेनाश्या झाल्या. देवचं लग्न झालं पण माझ्या मनात त्याच्या पत्नीविषयी किंवा देवविषयी कटुता नाही. पण देवविषयी ज्या भावना होत्या, त्या पुन्हा कोणाविषयी उद्भवल्या नाहीत एवढं खरं.!’

देववर प्रेम करणारी सुरैया पुढे एकाकी आयुष्य जगली. देवनं आपलं दुःख एकांताच्या काळोखात बुडवून टाकलं. देवच्या आयुष्यातलं एक पान गळून गेलं… एक पान गळून गेलं की त्या पानाच्या जागी नवं पान उगवतं. सुरैयाचं पान गळल्यावर देवच्या जीवनात मोना सिन्हा नावाचं नवं पान उगवलं.

मोना सिन्हा! सिमल्यातल्या सुखद हवेतल्या संपन्न घरात मोनाचं बालपण गेलं होतं. सिमल्यातल्या उंच उंच झाडांनी तिला शाळेत जाताना पाहिलं होतं, आधुनिक विचारसरणी असलेल्या वैचारिक वातावरणात ती मोठी होत कॉलेजमध्ये जाऊन शिकली होती. सेंट बीडीस् कॉलेजमधून ती पदवी घेऊन बाहेर पडली

मोनाचा चेहरा लडिवाळ आणि लोभसवाणा होता. हास्यात लाघव होतं. आवाजाला पैंजणाच्या आवाजासारखी लय होती. ‘मिस सिमला’ हा किताब तिनं मिळवला होता. अवखळ, अल्लड मोना चित्रपटांची शौकीन होती. अशीच एकदा ती सिमल्यातील थंड हवेची झुळूक अंगावर झेलत गर्द हिरव्या वातावरणात रस्त्यावरून फिरत होती. रस्त्यावर टांगलेल्या ‘नमुना’ चित्रपटाच्या पोस्टरकडे गेली. त्या काळात अशी पोस्टर्स जाहिरातीचं हुकूमी तंत्र होतं. त्या पोस्टरवरच्या नायकाचं नाव तिच्या मनाशीच तिने मोठय़ांदा बोलून पाहिलं.

देव आनंद! एका सुट्टीत मोना मुंबईच्या आपल्या मामेबहिणीकडे आली. या मामेबहिणीचे नाव होते उमा. ही उमा अत्यंत बुध्दीमान होती. इंग्लिश विषय घेऊन एम. ए. झालेली उमा वृत्तपत्रातून लेखनही करायची. आकाशवाणीसाठी देखील ती लिहू लागली. याच सुमारास देव आनंदचा मोठा भाऊ चेतन आनंद हा डून स्कूलमधील शिक्षकाची नोकरी सोडून स्वरचित कथेसाठी निर्माता शोधायला मुंबईत आला होता. याच वळणावर त्याची ओळख उमाशी झाली आणि ते लग्न बंधनात अडकलेदेखील. उमाचे लेखनप्रेम कायम होतं पण तिने चेतनने निर्माण केलेल्या ‘नीचा नगर’ चित्रपटात छोटीशी भूमिकादेखील केली होती.

देव आनंदने नवकेतन ही चित्रपट संस्था निर्माण केली आणि त्याने ‘अफसर’ काढला होता. त्या सुमारास मोना सिन्हा आपल्या मामेबहिणीकडे पाहुणी म्हणून राहायला आली होती. तिला चित्रपटसृष्टीत यावं असं वाटू लागलं होतं. तिच्याजवळ तिचे फोटो होते. हे फोटो तिने आपल्या बहिणीजवळ देउन चेतनजीना दाखवायला सांगितले. चेतनजींनी ते फोटो पाहून आपल्या धाकटय़ा भावाकडे देवकडे दिले. देव त्यावेळी नव्या नायिकेच्या शोधात होता.देवने हे फोटो बराच वेळ निरखून पाहिले. त्याला फोटोतली ‘ती’ आवडली. त्यानं तिला हॉर्नबील रोडवरच्या एका फोटोच्या दुकानात, आणखी काही फोटो काढायला बोलावलं. आकर्षक दिसणारी मोना सिन्हा देवच्या निरोपानुसार त्याला भेटायला त्या फोटोच्या दुकानात गेली.

दोघांची ही पहिली भेट. देवला ‘बाजी’ ची नायिका सापडली.पण चित्रपटात नायिकेची भूमिका करणार्या नटीचं नाव म्हणून मोना हे नाव त्याला आवडलं नाही तसं त्यानं चेतनला सांगितलं. चेतनने मोनाचं नाव कल्पना कार्तिक ठेवावं असं सुचवलं. देवला हे नवं नाव आवडलं. मग मोना सिन्हा ही कल्पना कार्तिक झाली आणि नंतर तीच झाली मिसेस देव आनंद!

[email protected]