गुलदस्ता – अवचित घडावी अर्थपूर्ण भेट

>> अनिल हर्डीकर

रंगभूमीला अर्थपूर्णता प्राप्त करून देणारे दोन दिग्गज म्हणजे दामू केंकरे आणि विजया मेहता. त्यांच्या नावांशिवाय ती अपूर्ण होईल इतकी घसघशीत आणि लक्षणीय कामगिरी या दोघांनी केली आहे. अशा या दिग्गजांची पहिली भेट अवचित घडावी अशी परंतु रंगभूमीच्या नियमाला साजेशी.

मराठी रंगभूमीवर ज्या नाटय़ दिग्दर्शकांनी यशस्वी आणि लोकप्रिय कारकीर्द केली अशा दिग्दर्शकांची यादी केली तर ती दामू केंकरे आणि विजया मेहता यांच्या नावांशिवाय अपूर्ण होईल इतकी घसघशीत आणि लक्षणीय कामगिरी या दोघांनी केली आहे. दामू केंकरे यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांची यादी केवळ विस्तारभयापोटी देण्याचा मोह आवरतो. संगीत नाटक अकादमी पुरस्कार तत्कालीन राष्ट्रपती झाकीर हुसेन यांच्या हस्ते त्यांना मिळाला होता. दिग्दर्शनासोबत अभिनय, नेपथ्य आणि प्रकाशयोजनाकार म्हणूनही त्यांनी कामगिरी केली असली तरी त्यांचा विशेष गौरव झाला आणि ते रमले दिग्दर्शनात. महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक खात्याचे संचालक पद त्यांनी भूषविले आणि नंतर गोव्याच्या कला अकादमीचे. मी उभा आहे, उद्याचा संसार, साष्टांग नमस्कार, लग्नाची बेडी ही आचार्य अत्रे लिखित नाटके त्यांनी सुरुवातीच्या काळात दिग्दर्शित केली. घेतलं शिंगावर, वल्लाभपूरची दंतकथा, सभ्य गृहस्थहो, अखेरचा सवाल, सूर्याची पिल्ले, आपलं बुवा असं आहे, चंद्र जिथे उगवत नाही, स्पर्श, कालचक्र, अंमलदार… ही त्यांची नाटके गाजली.

मराठी प्रायोगिक रंगभूमीच्या इतिहासात विजया मेहता हे अग्रगणी असलेले नाव. मराठी रंगभूमीवर स्त्राr दिग्दर्शिका हातावर मोजता येतील इतक्याच. सई परांजपे हे एकच नाव आवर्जून उल्लेख करावा असे. विजया मेहता यांचा जन्म बडोद्याचा. त्यांनी रंगभूमीचा अभ्यास केला इब्राहिम अल्काजी यांच्याकडे. पुढे त्या खोटे झाल्या आणि नंतर मेहता. विजया मेहता यांचे नाव समांतर सिनेमात आवर्जून घेतले जाते. मुंबईतल्या ‘रंगायन’ या नाटय़संस्थेच्या त्या संस्थापिका. त्यांच्या सोबत होते लेखक विजय तेंडुलकर, श्रीराम लागू आणि अरविंद देशपांडे असे जाणकार होते.

1984 साली आलेल्या ‘पार्टी’ या चित्रपटातील विजया मेहता यांच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. 1985 साली एशिया पॅसिफिक फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना मिळाला. दिग्दर्शक म्हणून ‘रावसाहेब’ करत असताना त्याच चित्रपटातील अभिनयाबद्दल सहाय्यक अभिनेत्री म्हणून पुरस्कार त्यांना मिळाला आणि ‘पेस्तनजी’ या चित्रपटाने त्यांना वेगळी ओळख मिळवून दिली. 1975 साली त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला. एक शून्य बाजीराव आणि अजब न्याय वर्तुळाचा या नाटकांनी मराठी नाटय़ रसिकांना वेगळा आनंद दिला. विजयाबाई नवी नवी शिखरे पादाक्रांत करत राहिल्या. भास यांनी लिहिलेल्या ‘मुद्राराक्षस’ या नाटकाचे सादरीकरण त्यांनी जर्मन कलाकारांना सोबत घेऊन केले. दिग्दर्शक या नात्याने त्यांनी केलेल्या स्मृतीचित्रे, शाकुंतल, हवेली बुलंद थी, हमीदाबाई की कोठी या टीव्ही चित्रपटांना अमाप लोकप्रियता लाभली. हमीदाबाईची कोठी, पुरुष ही वैशिष्टय़पूर्ण नाटके विजयाबाईंच्या दिग्दर्शनामुळे गाजली. लाईफलाईन ही 1991च्या सुमारास केलेली चित्रमालिका आपल्याला स्मरत असेल.

तर विजया मेहता आणि दामू केंकरे ही दोन्ही माणसे दिग्दर्शक म्हणून नावाजलेली. यांची पहिली भेट कशी झाली ते दामू केंकरे यांच्या पंच्याहत्तरीला प्रसिद्ध झालेल्या ‘दामू केंकरे – तीन अंकी गुरुकुल’ या पुस्तकात विजया मेहता यांनी सुंदर आणि मोजक्या शब्दांत सांगितली आहे. त्या लिहितात,

‘दामू’ला बरेचदा मी ‘डॅम्स’ म्हणते. डॅम्सची आणि माझी मैत्री पुरातन काळची… इसवी सन 1948-49 सालापासूनची. मित्रमैत्रिणींबरोबर उंडारण्याचा, वेगवेगळे अनुभव घेण्याचा एक भन्नाट काळ असतो, त्या काळातली. अशा काळात खूप नाती जुळतात. काही पुढे अधिक जुळतात, काही पुढे अधिक खुलतात, घनिष्ट होतात. तर काही ‘हो, हो आमची ओळख आहे ना!’ मध्ये स्थिरावतात. डॅम्सचं आणि माझं नातं यापैकी कुठल्याही प्रकारातलं नाही.’ त्या पुढे लिहितात, “डाम्सला मी पहिल्यांदा पाहिलं ते फोटोत बंदिस्त असावं इतकं स्पष्टपणे आठवतंय. विल्सन कॉलेजच्या हॉलमध्ये दाजी भाटवडेकर माझी तालीम घेत होते. बहुदा वाङ्मय मंडळाच्या स्पर्धेसाठी ‘संशय कल्लोळ’मधील कृत्तिकेची असावी ती तालीम. एक दाढीवाला आला आणि शांतपणे एका खुर्चीवर तालीम पाहत बसला. कॉलेजमधला नव्हता. दाजी म्हणाले, हा दामू केंकरे… जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये असतो, नाटकवेडा आहे…’’

अशी ही दोन दिग्गजांची त्यांच्या उमेदीच्या काळात झालेली भेट. रंगभूमीला अर्थपूर्णता प्राप्त करून देणारी ही भेट अवचित घडावी अन् अध्याय बनून राहावी अशीच म्हणायला हवी.

[email protected]