
श्री विठ्ठल भक्त अनिल एकनाथ खेडकर यांचे मूळ गाव अहिल्यानगर असून ते सध्या लंडन येथे स्थायिक आहेत, ते युके म्हणजेच लंडन येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे भव्य मंदिर साकारणार आहेत. त्यानिमित्ताने आज पादुकासह दिंडी श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात आल्यानंतर मंदिर समितीच्या वतीने पादुकांचे गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शपुंतलाताई नडगिरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखा अधिकारी मुकेश अनेचा व विभाग प्रमुख पांडुरंग बुरांडे तसेच अनिल खेडकर उपस्थित होते. दि. 14 एप्रिल ते 21 जून दरम्यान पंढरपूर ते लंडन अशी आंतरराष्ट्रीय दिंडी निघणार आहे. यासाठी लंडन येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर टीम प्रयत्नशील आहे. याबाबत माहिती देताना अनिल खेडकर म्हणाले, मी गेल्या 7 वर्षांपासून आळंदी ते पंढरपूर पायी अशी वारी करत आहे. अमेरिका, युरोप, लंडन येथे अनेक भारतीय मंदिरे आहेत. इस्कॉन, अक्षरधाम तसेच राजस्थान येथील देवतांची मंदिरे परदेशात आहेत पण एवढी जुनी संत साहित्य परंपरा असलेले पंढरपूर येथील मंदिर नाही. यासाठी वारी साता समुद्रापार नेण्यासाङ्गी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 22 देशातून 18000 किलोमीटरचा प्रवास करत ही दिंडी निघणार आहे. त्यासाठी सर्व देशांचा व्हिसा, वाहनांचे परमिट व इतर अनुषंगिक कायदेशीर तयारी केली आहे.