
नागपूर येथे झालेल्या दंगलीनंतर होत असलेल्या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. नेहमीच शांत आणि सर्वधर्मीय लोकांच्या शहरात 17 मार्चची घटना इतिहासातील एक काळा दिवस ठरला. यात जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई व्हावी, परंतु कारवाईच्या नावाखाली निर्दोष लोकांवर कारवाई करू नका, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे.
बेकायदेशीर बांधकाम असेल तर ते तोडण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर 2024 मध्ये दिलेल्या निर्णयात काही नियम निश्चित केले आहे. परंतु नागपूर येथे दंगलीमधील आरोपींचे घरे पाडण्याची कारवाई या नियमानुसार झाली नसल्याचे देशमुख यांनी पत्राद्वारे अधोरेखित केले आहे.
कायदा हातात घेण्याची भाषा करणे हे गंभीर आहे
नागपूर शहर हे हिंदू-मुस्लिम एकत्र नांदणारे शहर आहे. राज्यातील काही मंत्री हे समाजासमाजामध्ये तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्य करत आहेत. दुसरीकडे बजरंग दलाचे प्रमुख पदाधिकारी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारने जर औरंगजेबाची कबर काढली नाही तर आम्ही कारसेवा करून ती काढू, अशी जाहीर धमकी देतात. विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी कायदा हातात घेण्याची भाषा करतात हे फार गंभीर आहे, असे देशमुख यांनी म्हटले आहे.