SAIF सुद्धा SAFE नाही! विरोधकांनी सोडले महायुती सरकारवर टीकेचे बाण

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर वांद्रे येथील राहत्या घरात चाकूने हल्ला झाला. घरात घुसलेल्या चोराने त्याच्यावर पाच ते सहा वार केले. यात सैफच्या मानेला, हाताला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेवर सिनेकलाकारांसह राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या असून महायुती सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक ट्विट करत महायुती सरकारवर निशाणा साधला. ‘सैफ सुद्धा SAFE नाही! सैफ अली खान सारख्या मोठ्या कलाकारांवर असे हल्ले होणे दुर्दैवी आहे. पोलीस प्रशासनाने या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी’, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली.

तसेच आपली मुंबई आपला महाराष्ट्र कलाकारांचा आश्रयदाता आहे. कलाकारांसाठी भयमुक्त व पोषक वातावरण असणे, ही सरकारची जबाबदारी आहे, असेही अनिल देशमुख म्हणाले.

दरम्यान, या घटनेवर खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली असून ही चिंताजनक घटना आहे, असे त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी सैफच्या कुटुंबातील सदस्यांशी फोनवरून संवाद साधला असेही वृत्त माध्यमांनी दिले आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली.