गुन्हेगारी रोखण्यास गृह विभागाला अपयश, गुड गर्व्हनन्स अहवालातील विदारक सत्य

राज्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. हत्या, अपहरण, दरोडा, अत्याचार यांसारख्या गंभीर गुह्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. नुकताच गुड गर्व्हनन्स अहवाल समोर आला असून यात राज्यातील 36 पैकी 32 जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यास गृह विभाग अपयशी ठरला असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यावरून गुन्हेगारी रोखण्यासाठी गृह विभाग हा सपशेल अपयशी ठरत आहे, असे मत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.

गुड गर्व्हनन्सच्या अहवालात दहा क्षेत्रातील कामगिरीचा आढावा घेण्यात आला. त्यापैकी न्याय व लोकसुरक्षा (गुन्हेगारी) तसेच सामाजिक विकास या दोन क्षेत्रात सर्वच जिल्हे पिछाडीवर आहेत. त्यामुळे एकीकडे ढासळलेले सामाजिक संतुलन आणि त्यातून वाढलेल्या गुन्हेगारीचा मुद्दा या अहवालातून प्रकर्षाने पुढे आला आहे. सामाजिक विकासात राज्यातील केवळ तीन जिल्हय़ांनी 50 टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेतले. बाकीचे 33 जिल्हे हे नापास झाले आहेत. या गंभीर बाबीकडे राज्यातील गृह विभागाने वेळीच लक्ष देण्याची गरज असल्याचे अनिल देशमुख म्हणाले.