माझ्या ज्या काही ‘क्लिप्स’ तुमच्याकडे असतील त्या हिंमत असेल तर बाहेर काढाच, असे खुले आव्हान राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणाच्या आरोपातून सुटका हवी असेल तर चार खोटी शपथपत्रे करून देण्यासाठी फडणवीस यांनी आपल्यावर दबाव आणला होता. त्या घटनाक्रमाचा पेन ड्राइव्ह माझ्याकडे असून फडणवीस यांच्या कटकारस्थानांचा पुराव्यासह विस्फोट करणार असल्याचा इशारा देशमुख यांनी आज पुन्हा एकदा दिला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत अनिल देशमुख काय बोलले याच्या ‘क्लिप्स’ माझ्याकडे आहेत. नाइलाजास्तव त्या बाहेर काढाव्या लागतील, असा इशारा दिला होता. त्यावर बोलताना देशमुख म्हणाले, फडणवीस यांच्याकडे अशा कोणत्याही क्लिप्स नाहीत. मला माहिती आहे, पण ते त्यांच्यावरील आरोपाचा लंगडा बचाव करण्यासाठी असे काहीतरी सांगत आहेत. तरीदेखील त्यांच्याकडे क्लिप्स असतील तर त्यांनी जनतेसमोर आणाव्यात. माझे त्यांना आव्हान आहे.
देशमुख पुढे म्हणाले, मी पुराव्याशिवाय बोलत नाही. तीन वर्षांपूर्वी फडणवीस यांनी पाठवलेला एक खास माणूस माझ्या शासकीय निवासस्थानी चार शपथपत्रे घेऊन आला होता. पहिल्या शपथपत्रात उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठी माझ्याकडे पैसे मागितले, असे नमूद होते. दुसऱया शपथपत्रात आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालियनप्रकरणी गंभीर आरोप होते. तिसऱया प्रतिज्ञापत्रात अनिल परब यांच्यावरील आरोप होते तर चौथ्या प्रतिज्ञापत्रात अजित पवार यांनी मला गुटखा व्यावसायिकांकडून वसुली करण्यास सांगितले, असे नमूद होते. या चारही प्रतिज्ञापत्रांवर मी स्वाक्षरी करावी व तसा जबाब तपास यंत्रणांसमोर द्यावा, या बदल्यात परमबीर सिंग यांच्या आरोप प्रकरणातून सुटका होईल, असे संबंधित व्यक्तीने मला सांगितले होते. या घटनाक्रमाचा पुरावा ‘पेन ड्राइव्ह’मध्ये माझ्याकडे आहे.
विरोधकांना धमकावण्यासाठी गृहमंत्रीपदाचा वापर – नाना पटोले
गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे काही ऑडिओ-व्हिडीओ क्लिप असतील तर त्यांनी कारवाई केली पाहिजे, त्यांना अडवले कोणी? निवडणुकीच्या तोंडावर वादग्रस्त विधाने करून काय उपयोग. गृहमंत्रीपदाचा उपयोग काय फक्त विरोधकांना धमकवण्यासाठी करत आहात काय, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
चारही प्रतिज्ञापत्रांवर मी स्वाक्षरी करावी व तसा जबाब तपास यंत्रणांसमोर द्यावा, या बदल्यात परमबीर सिंह यांच्या आरोप प्रकरणातून सुटका होईल, असे फडणवीसांनी पाठवलेल्या व्यक्तीने मला सांगितले होते. त्याचा पुरावा ‘पेन ड्राइव्ह’मध्ये माझ्याकडे आहे.