लठ्ठ मुश्रीफांनी ससूनमध्ये बॅरिएट्रिक सर्जरी करावी – अनिल देशमुख

पुण्याच्या ससून रुग्णालयातील गैरसोयींबाबतच्या तारांकित प्रश्नावर आज विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची चांगलीच खिल्ली उडवली. ससूनमध्ये काही दिवसांपूर्वी उंदीर चावून एक रुग्ण दगावला होता, मग सरकारने त्या उंदरांचा काही बंदोबस्त केला का? असे देशमुख यांनी विचारले. त्यानंतर त्यांनी मुश्रीफ यांच्या लठ्ठपणावर कोटी करत दुसरा प्रश्न विचारला. लठ्ठ माणसांना वजन कमी करण्यासाठी बॅरिएट्रिक सर्जरी केली जाते, ससूनमधील ती सोय करून देणार का? स्वतः मंत्रीमहोदय तिथे पेशंट म्हणून जाणार का? असे देशमुख यांनी विचारताच सभागृहात हशा पिकला. मुश्रीफ यांनीही मिश्कीलपणे त्याचे उत्तर दिले. माझे वजन कमी केल्यानंतरही लोकांच्या तक्रारी कायम होत्या. त्यामुळे माझे वजन मी व्यायाम करून व्यवस्थित कमी करेन, त्याची काळजी तुम्ही करू नका, असे ते देशमुख यांना म्हणाले.