सोहळा- चैतन्यमयी… आनंदमयी…

>> अनघा सावंत

कोकणातील गणेशोत्सव म्हटला की, इथला कोपरा न् कोपरा जिवंत होऊन चैतन्यमयी वातवरण तयार होतं. जुन्याजाणत्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे सोपवले जाणारे संस्कार सोहळ्याला प्रसन्न, समाधानी रूप बहाल करतात अन् हस्तमुखाने घरची लक्ष्मी सोहळ्याला आनंदमयी रूप देते.

कोकणातील गणेशोत्सवाची ओढ आणि त्या ओढीने कुटुंबातील आम्ही सगळे मुंबईकर घरच्या गणपतीला अगदी आवर्जून गावी गेलेलो. वर्षभर शांत असलेल्या आमच्या प्रशस्त घराचा कोपरा न कोपरा जिवंत होऊन घरही चैतन्यमय झालेलं. आमच्या कुटुंबात एकूण सात बिऱहाडं. त्यामुळे प्रत्येक बिऱहाडागणिक बाप्पाला रोज सात नैवेद्य. हिरवट-पोपटी केळीच्या पानावर भाताची मूद, त्यावर पिवळंधम्मक घट्ट वरण, उसळी, पावसाळी हिरव्या भाज्या, मोदक, खीर, नेवऱया, मालपोआ, कडबोळी, पातोळ्या, भजी, अळूवाडी यांनी सजलेला साग्रसंगीत नैवेद्य. मग कुटुंबाची एकत्रित आरती आणि आरती म्हणतानाच डोळ्यांत साठवावं असं बाप्पाचं तेजस्वी, समाधानी रूप… ‘मी आहे पाठीशी’चा विश्वास देणारं. रात्री सासू, सुना, जावा, नणंदा, शेजारणी सगळ्यांनी मिळून घातलेल्या पारंपरिक फुगडय़ा, वळईत पुरुषांच्या चाललेल्या गप्पा, पत्त्यांचे रंगलेले खेळ. गणपतीत असं आनंदोत्सवात रंगलेलं घर…

म्हणता म्हणता दिवस कधीच सरले आणि विसर्जनाचा दिवसही आला. अनंत चतुर्दशी… या दिवशी म्हामदं. म्हणजेच बाप्पाला सगळ्या बिऱहाडांनी एकत्रित मिळून केलेला एकच नैवेद्य. त्यामुळे स्वयंपाकाची जोरदार तयारी सकाळीच सुरू झालेली. पेटाऱयातील मोठमोठाले टोप, पराती, भलेमोठे चमचे बाहेर निघून घासूनपुसून, उजळून स्वयंपाकासाठी सज्ज झालेले. ‘चला गो, आता नवीन सुनांका चूल घेव दे…’ पहिल्या पिढीतील सासूने हुकूम सोडला आणि दुसऱया पिढीतील सासवांनी स्वतहून चूल तिसऱया पिढीतील नवीन सुनांच्या हातात दिली. स्वखुशीने, विश्वासाने आणि आनंदाने…

घरात नवीन आलेल्या सुना नवं घर, अनोळखी माणसं, वेगळं वातावरण आपलेपणाने स्वीकारून पदर खोचून काम करण्यास सज्ज झाल्या. हिरवेगार भरगच्च चुडे भरलेले ते देखणे हात कसलीही कुरकूर न करता जुन्याजाणत्या पिढीकडून मार्गदर्शन घेत चुलीवर रांधायला पुढे सरसावले. आधुनिक काळातील या मुंबईकर सुना आपली संस्कृती, परंपरा आनंदाने स्वीकारून आत्मविश्वासाने वावरत होत्या. पन्नाशी-साठीची आमची दुसरी पिढी मदतीला होतीच. घरातील तीन बिऱहाडात चुली धगधगल्या होत्या. आजे सासवा, सासवा, सुना, नातसुना, जावाजावा, माहेरवाशिणी नणंदा सगळ्या मिळून स्वयंपाक करत होत्या. काम करताना होणारी बांगडय़ांची किणकिण, पैंजणांचा गोड नाद कानाला सुखद वाटत होता.

आजे सासवांना असलेलं नात सुनांचं कौतुक, सासवांची गोड दादागिरी, एकमेकींची मस्करी, गमतीजमती, मधेच कोणीतरी येऊन आम्हा महिला वर्गाची केलेली फोटोग्राफी असं आनंदाला उधाण आलेलं. मोदकांचा गोड सुवास, वडय़ांचा घमघमाट घरभर दरवळत होता. स्वयंपाक झाल्यावर पंचपक्वान्नांचा साग्रसंगीत नेवैद्य बाप्पाला दाखवून तल्लीन होत जोशात आरती झाली. प्रथम लहान मुलांच्या, मग घरातील पुरुषांच्या जेवणाच्या पंगती बसल्या. सर्वांना तृप्त झालेलं पाहून समाधान पावलेल्या घरच्या लष्म्या शेवटच्या पंगतीत गप्पा मारत एकत्र जेवायला बसल्या… स्त्रियांना वाढायला पुरुष मंडळी, मुलं होती. शेवटची पंगत म्हंटल्यावर कमी-जास्त व्हायचंच. त्यामुळे ‘मोदक संपले की काय’ एकच बोंब झाली आणि आता मोदक काही ताटात मिळणार नाहीत असं मनात आलं. तेवढय़ात एक दीर म्हणाला, “तुमच्यासाठी मोदकांचा याक ताट आधीच बाजूक ठेवलंय. तुमची मेहनत आसा. तुमका पयला राखून ठेवक व्हया ना.’’ हे ऐकून सगळ्याच घरच्या लष्म्यांची मनं मोदक खाण्याआधीच तृप्त झाली. जेवणं आटोपल्यावर पुरुष मंडळी विसर्जनाच्या तयारीला लागली तर न कंटाळता, न दमता जेवणाचे मोठे मोठे रिकामी पण जड असलेले टोप, त्यात भांडी भरून आपल्या डोक्यावर घेऊन माझ्या घरची ग्रामीण स्त्राrशक्ती भांडी घासायला व्हाळावर निघाली. शेतीसाठी, संसारासाठी अपार मेहनत करणारी ती. काया अगदी काटकुळी. पण केवढी ती तिच्यातील ताकद आणि कमालीची काटकता…

सायंकाळी पाच वाजता श्री गणेशाची उत्तरपूजा, आरती करत ‘गणपती बाप्पा मोरया’चा एकच जयघोष झाला. घरातील लहानथोर सर्वांनी आरती घेतली. इच्छित मनोकामना सांगितल्या, गाऱहाणी घातली गेली आणि अखेर बाप्पा आपल्या घरी निघाले. खळ्यात भलीमोठी पालखी सजवून तयार होती. त्या सजवलेल्या पालखीत बाप्पा विराजमान झाले. आनंद आणि अश्रू यांचा संगम घालत सगळं कुटुंब सजूनधजून वाजतगाजत बाप्पाच्या विसर्जनाला निघालं. वाडीतले सगळे गणपती व्हाळावर आले होते. विविध रुपातील, विविध रंगातील बाप्पा भक्तांच्या अलोट प्रेमात न्हाऊन निघाले होते. सर्वांची मिळून एक महाआरती झाली. प्रत्येकाने गणपतीच्या समोर लावलेल्या दिव्यांनी परिसर उजळला होता. धूप-अगरबत्तीच्या सुवासाने मन अधिक प्रसन्न होत होतं. ‘निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी, चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी…’ म्हणत सर्वांनी बाप्पाचा निरोप घेतला.

‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष झाला आणि एक एक करत सगळे बाप्पा मनोमन पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आश्वासन भक्तांना देत मार्गस्थ झाले. बाप्पाला निरोप देऊन आम्ही सगळे घरी परतलो. बाप्पाची कमतरता जाणवत असली तरी अजून दोन दिवस सगळं कुटुंब एकत्र राहणार होतं. घर लहानथोरांच्या हसण्याने, गप्पांच्या फडाने रंगणार होतं. म्हणून घरही आनंदाने खळखळून हसत होतं. कोण जाणे, माणसांसारखंच घरालाही वर्षातून एकदा मिळालेलं हे चैतन्यमय सुख पुढच्या वर्षीपर्यंत साठवून ठेवायचं असेल…

[email protected]